दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
” जहां नही चैना, वहां नही रहना,”
महायुतीमधील अतृप्त आत्मे आता पोपटासारखे बोलायला लागले असून येणाऱ्या काळात या अतृप्त आत्म्यांमुळे तीनही घटक पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.छगन भुजबळ यांनी आज समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून भावी लढाईचे रणशिंग फुंकले आहे.
दुसरीकडे डॉ.तानाजी सावंत यांनीही आपल्या मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्याची बैठक घेतली व ते सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.हनुमान चालीसा पठण करणारे राणा देखील आता हात चोळत अमरावती या आपल्या मूळ गावी परतले आहेत.गेली पाच वर्षे राणा पती – पत्नीने देवेंद्र व अमित गाथाचे पठण केले,पण आता या दोघांवर घरात बसून हनुमान चालीसा पठण करण्याची वेळ आली आहे.विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या पत्नीच्या पराभवाला हातभार लावल्यामुळे अजित पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळात येऊ दिले नाही.त्यामुळे त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे.राज्याचा बिहार होत असल्याची आरोळी त्यांनी ठोकली आहे.सुधीर मुनगंटीवार यांचाही थयथयाट सुरू झाला आहे.मला मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यामागे कोणाचा हात आहे,हे मला कळायला हवे,असा ते टाहो फोडत आहेत.दीपक केसरकर बिचारे,ही माझी शेवटची निवडणूक आहे,असा घसा ओरडुन सांगत होते,पण महायुतीच्या नेत्याच्या हृदयाला पाझर फुटला नाही.शिंदे यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे.पण त्यांच्या मदतीला शिंदेही येऊ शकले नाहीत.एकेकाळचे त्यांचे विरोधक नितेश राणे यांनी त्यांच्या उरावर बसत,कॅबिनेट मंत्री पद मिळवले आहे.बोरिवली मागाठणे येथील आ.प्रकाश सुर्वे हे देखील आता मुंबईला परतले आहेत.यावेळी आपल्याला मंत्रिमंडळात हमखास स्थान मिळेल,असे गृहीत धरून त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते.ते आता प्रेमभंग झालेल्या प्रियकराच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

