दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता,
शिवसेनेचे ( उबाठा ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे,अनिल परब व वरुण सरदेसाई यांनी आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेतली.यावेळी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,या दोघांमध्ये दहा ते पंधरा चर्चा झाली.ही भेट फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी होती,असे वरवर सांगण्यात येत असले तरी ही भेट राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याची चिन्हे आहेत,असे संकेत मिळत आहेत.
निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर झालेल्या शिवसेनेच्या पहिल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत राहावे की न राहावे,याविषयी पक्षाचे नेते,उपनेते,आमदार,खासदार व अन्य पदाधिकारी यांच्याकडून मते जाणून घेतली होती.अनेकांनी यावेळी महाविकास आघाडीत राहणे,आपल्याला त्रासदायक ठरेल,असे स्पष्ट केले होते.त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कडवे हिंदुत्वाचे धोरण स्विकारण्याचा निर्णय घेतला व तसे वक्तव्य देखील त्यांनी जाहीरपणे केले होते.त्या पार्श्वभूमीवर त्यांची आजची ही भेट चर्चेला आमंत्रण देणारी ठरली आहे.ही भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे विधानसभेचे सभापती नार्वेकरानाही भेटले.त्यामुळे राजकीय क्षेत्रात आता चर्चेला उधाण आले आहे.दुसरीकडे तिकीट,जागा,मंत्रिपद व खातेवाटप,यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये सध्या दुरावा निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीमध्ये या दोघांची झालेली भेट,ही शिंदे गटासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.भाजपने एकनाथ शिंदे व अजित पवार,या दोघांना सोबत घेऊन ठाकरे सरकारला खाली खेचले.पण महायुतीच्या या दोन घटक पक्षाबाबत भाजपमध्ये आजही प्रचंड नाराजी आहे.त्यांची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या मुखपत्रातून सडकून टीका केली होती.या दोघांना सोबत घेतल्यामुळे आपला लोकसभा निवडणुकीत पराभव झाला,असा थेट आरोप त्यांनी केला होता.या सर्व घडामोडीवरुन राज्यात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

