दीपक मोहिते,
कायदा व सुव्यवस्थेची ढासळती परिस्थिती,
महाराष्ट्राची वाटचाल,बिहार होण्याच्या दिशेने,
गेल्या अडीच वर्षात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत खालावली आहे.दिवसागणिक हत्या,अपहरण,बलात्कार,
वाहने जाळणे,हिट अँड रन, अशा घटना वारंवार घडत असतात.त्यावर नियंत्रण आणण्याकामी पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे.पण नुकत्याच घडलेल्या एका घटनेने पोलीसच आता गुन्हेगारांच्या भूमिकेत वावरू लागल्याचे दिसून आले आहे.परभणी येथे जे काही घडले,ते पोलिसांसाठी लांछनास्पद असून गृहविभागाने त्याची गंभीर दखल घ्यायला हवी.कायद्याची परीक्षा देण्यासाठी परभणीत आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी,या तरुणाचा पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला.त्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात परभणी शहर पेटले.
या शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची १० डिसें.रोजी अज्ञात व्यक्तीकडून विटंबना झाली होती.त्यानंतर दुसऱ्या दिवशी परभणी बंदची हाक देण्यात आली होती.या बंदच्या दिवशी मोठ्याप्रमाणात जाळपोळीच्या घटना घडल्या.परिस्थितीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला व दगडफेक करणाऱ्या काही तरुणांना ताब्यात घेतले व गुन्हे दाखल केले.त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा समावेश होता.मारहाणीमुळे सोमनाथ यांच्या छातीत कळ आली,त्यास पोलिसांनी त्वरित रुग्णालयात दाखल केले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.त्याचा मृत्यू हा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे झाल्याचे निदान करण्यात आले.पण नंतर शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू हा पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळे झाल्याचे उघड झाले व पुन्हा परभणी शहरातील वातावरण तंग झाले.दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी परभणीला भेट देऊन सोमनाथच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देऊ असे स्पष्ट करत,याप्रकरणी त्यांनी सरकारकडे विविध मागण्या केल्या.तर
शिवसेनेच्या ( उबाठा ) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमनाथ याच्या मृत्यूला पोलीस निरीक्षक शरद मरे,पोलीस उपनिरीक्षक तूरणार व स्थानिक गुन्हे शाखेचे गोरबाण,हे तीन अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
या सर्व घडामोडी लक्षात घेता राज्याची पोलीस यंत्रणा दिवसेंदिवस मुर्दाड होत चालल्याचे दिसून येत आहे.अंतरवली – सैराट येथेही पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीहल्ल्यात अनेक वृध्द,महिला व लहान मुले जखमी झाले होते.त्यापैकी अनेकजण आजही जायबंदी अवस्थेत पाहायला मिळतात.मात्र ही पोलीस यंत्रणा,पुण्यातील कोयता गँगला नेस्तनाबूत करू शकत नाही,बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकरी व त्यांना मदत करणाऱ्या राजकारणी लोकांना हुडकून काढू शकत नाही.त्यामुळे लोकांचा ” पोलीस,” या शब्दावरून विश्वास उडू लागला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे,या खात्याचा गेल्या अडीच वर्षातील कारभार व पोलीस यंत्रणेची खालावत चाललेली विश्वासार्हता पार लयाला गेली असून महाराष्ट्राची वाटचाल आता बिहार राज्याच्या दिशेने होऊ लागली आहे.

