दीपक मोहिते,
” अशांत महायुती,”
अजित पवार यांनी फडणवीस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भुजबळ यांची केली शिकार,
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर
मुनगुंटीवार व छगन भूजबळ या दोघांना फडणवीस व भुजबळ यांनी मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला आहे.मनोज जरांगे यांना मी अंगावर घेतल्यामुळे मला कटकारस्थान करून संधी नाकारल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.त्याचबरोबर भुजबळ यांनी ” मी तुमच्या हातामधील खेळणे आहे का ?” असा प्रश्न फडणवीस व अजित पवार यांना विचारला आहे.
मनोज जरांगे यांच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी महायुतीने अत्यंत आक्रमक असलेल्या भुजबळ यांचा मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान बेमालूमपणे वापर केला.छगन भुजबळ यांनीही जरांगे पाटलांवर प्रखर हल्ले चढवत त्यांना अक्षरशः जेरीस आणले.भुजबळ यांच्या आक्रमकतेपुढे जरांगे काहीसे बॅकफूटवर गेले.लोकसभा निवडणुकीत जरांगे यांनी महायुतीचे अनेक उमेदवार पाडण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती,त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये,यासाठी महायुतीने ही रणनिती आखली होती,ती शंभर टक्के यशस्वी ठरली.
पण ही रणनिती यशस्वी करण्यासाठी ज्या भुजबळ यांनी खस्ता खाल्या,त्या भुजबळ यांना मंत्रिमंडळ तयार करताना खड्यासारखे बाहेर फेकून देण्यात आले.७५ वर्ष वय असलेले भुजबळ हे अत्यंत आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात.त्यांच्या यशामध्ये शरद पवार यांचा मोलाचा वाटा आहे.चार दशकापूर्वी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यावरून त्यांचे बाळासाहेबांशी मतभेद होऊन त्यांनी शिवसेना सोडली.त्यावेळी त्यांना शरद पवार यांनी खूप मदत केली होती.त्याकाळी भाजपने सुरू केलेल्या ” कमंडलु ” ( राममंदिर उभारणी ) च्या राजकारणाला शह देण्यासाठी शरद पवार यांनी ” मंडल,” चा वापर आयुधासारखा करण्याचे ठरवले व त्यांच्या हाती छगन भुजबळसारखा आक्रमक नेता लागला होता.भुजबळ हे माळी समाजाचे नेते,त्यांचा महात्मा फुले यांच्या समतेच्या विचारसरणीशी दुरान्वये संबंध नव्हता.पण कालांतराने त्यांनी समता परिषद स्थापन केली व ते हळूहळू ओबीसी समाजाचे नेते झाले.वास्तविक कै.गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाला एकत्र करण्याचे महत्वाचे काम केले.त्यांनी राज्यभरात दौरे करून पवार यांच्या सरकार विरोधात रान उठवले व १९९५ साली सेना – भाजप युतीचे सरकार येऊ शकले.त्यामुळे ओबीसी समाजाचे थोर नेते अशी मुंडे ओळख निर्माण झाली.त्यांच्या अकाली निधनानंतर मात्र छगन भुजबळ यांचे नशीब फळफळले व ओबीसीचे नेते म्हणून ते नावारूपाला आले.आज या ओबीसी नेत्याचा फडणवीस,शिंदे व पवार या त्रिकुटाने पद्धतशीरपणे वापर केला व मराठा समाजाला चुचकारण्यासाठी त्यांच्या हाती नारळ दिला आहे.छगन भुजबळ यांची राजकीय वाटचाल,ही कायम वादग्रस्त ठरली.तेलगी प्रकरण व दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम,या दोन्ही प्रकरणात ते बदनाम झाले होते.महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात त्यांना फडणवीस यांनी जेलची हवा खायला लावली होती.अजित पवार यांनी जेव्हा बंड केले,तेंव्हा हे भुजबळ महाशय शरद पवारासोबत होते.अजित पवार यांच्या गटाची पहिली बैठक भुजबळ यांच्या वांद्रे येथील एमईटी या संस्थेच्या इमारतीमध्ये झाली होती.त्यावेळी भुजबळ यांनी पवार यांना भेटून आपण त्या बैठकीत काय होते,हे पाहण्यासाठी जातो,असे सांगून निघाले व थेट अजित पवार यांच्या गटात सामील झाले.त्यांचा शरद पवार यांच्यावर प्रचंड राग होता,पण त्यानी तो कधीही चेहऱ्यावर येऊ दिला नाही.तेलगी व महाराष्ट्र सदन प्रकरणी पवार यांनी मदत केली नाही,तसेच आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळू दिले नाही,असे त्यांचे म्हणणे होते.अजित पवार यांच्याशी त्यांचे कधीही पटले नाही.शरद पवार यांनी जेव्हा भुजबळ यांना पक्षात प्रवेश दिला होता,त्यावेळी अजित पवार यांना तो मान्य नव्हता.भुजबळ हे आपल्याला पर्याय ठरू शकतात,अशी त्यांना भिती वाटत होती.त्यामुळे अजित पवार यांनी आता फडणवीस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भुजबळ यांची शिकार केली.

