दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
महायुतीचे पुढील लक्ष्य मुंबई,ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका,
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल २१ दिवसांनी काल राज्याचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले.महायुतीमध्ये सलग १५ ते १६ दिवस जोरदार धमासान झाल्यानंतर कोणाला किती मंत्रिपदे,यावर कशीबशी तडजोड झाली.शिंदे गटातील वाचाळ मंत्र्यांना डच्चू देण्यासाठी भाजपने यावेळी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती व त्यांच्या गटाचे अब्दुल सत्तार,दीपक केसरकर,तानाजी
सावंत यांना बाहेरचा रस्ता दाखवला.तर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मराठा समाजाची नाराजी ओढवून घेणे,त्रासदायक ठरले.दुसरे एक नेते दिलीप वळसे पाटील,यांचे आजारपण व वाढते वय,अशी दोन कारणे पुढे करत,त्यांनाही घरी बसवण्यात आले.
मंत्रिमंडळाची रचना करताना भाजपने अतिशय धूर्त खेळी केल्याचे दिसून आले आहे.आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूका लक्षात घेऊन भाजपने मंगलप्रभात लोढा,आशिष शेलार व अतुल भातखळकर या तिघांचा समावेश केला आहे.या शहरात शिंदे गटाचे पाच,तर अजित पवार गटाच्या सना मलिक या एकमेव आमदार निवडून आल्या.पण या दोन्ही गटाला स्थान मिळाले नाही.प्रकाश सुर्वे वगळता इतर सारे आमदार नवखे असल्यामुळे कदाचित त्यांना संधी देण्यात आली नसावी.मुंबई शहरात भाजपला मिळालेले यश लक्षात घेता,महानगरपालिका निवडणुकीत भाजप हा शिंदे व अजित पवार गटाच्या उरावर बसून जागा हिसकावून घेईल,अशी शक्यता आहे.नवी मुंबई येथे भाजपने गणेश नाईक यांना संधी दिली आहे.गणेश नाईक,हे नवी मुंबई महानगरपालिका एकहाती जिंकून आणतील,अशी खात्री असल्यामुळे भाजपने त्यांना संधी दिली आहे.भाजप मुंबई,ठाणे व नवी मुंबई या तीन महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्याच्या तयारीत आहे.सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांना ते सहज आहे.

