संजय लांडगे,वाडा शहर,
जळलेल्या भाताच्या भाऱ्यांची आमदारांनी केली पाहणी,
वाडा तालुक्यातील जामघर येथे दोन शेतकऱ्यांच्या खळ्यामध्ये भाताच्या भाऱ्याच्या उडव्यांना अज्ञाताने आग लावण्याची घटना काल घडली होती.या घटनेची माहिती आ.शांताराम मोरे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.मात्र पंचनामा करण्यासाठी जागेवर कुठलाही अधिकारी पोहोचला नाही.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
जामघर येथे शेतकऱ्यांच्या खळ्यामध्ये भाताची भारे रचून ठेवण्यात आले होते.अज्ञात इसमाने पाचशेहून अधिक भारे जाळले होते.या घटनेमध्ये किसन गणपत पाटील व दिनेश बापू पाटील,या दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.आज आ.शांताराम मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला.मात्र दोन दिवसांपासून घटनास्थळी एकही अधिकारी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पोहोचला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.याबाबत अज्ञात इसमाविरोधात वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

