सुधीर केदारे,इगतपुरी,
कै.मधुकरराव पिचड ; आदिवासी विकासाचे शिल्पकार
कै.मधुकरराव पिचड यांना आपल्यातून जाऊन १० दिवस झाले असले तरी त्यांचे कार्य, विचार,आणि योगदान यांचा ठसा समाजावर सदैव कायम राहील.पिचड हे केवळ राजकारणी नव्हते तर ते समाजसेवेचे प्रतिक होते. त्यांनी आयुष्यभरात आदिवासी,गोरगरीब,आणि वंचित घटकांसाठी झटून कार्य केले.
मधुकरराव पिचड यांनी महाराष्ट्राच्या माजी आदिवासी विकासमंत्री म्हणून राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले.त्यांच्यामुळे आदिवासी समाजाला नवी दिशा मिळाली आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधला.
त्यांनी आदिवासी विकास मंत्री म्हणून काम करताना आदिवासी समाजासाठी स्वतंत्र बजेटला मंजुरी मिळवली.
आदिवासी समाजाच्या गरजा आणि प्रगतीची कवाडे उघडली गेली.ज्यामुळे अनेक विकासप्रकल्प राबवणे शक्य झाले.
आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र जनजाती आयोगाची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
आदिवासी उन्नती सेवा मंडळ, राजुरच्या माध्यमातून त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. या शाळेमुळे आदिवासी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली झाली.आदिवासी विभागाच्या विकासामध्ये त्यांचे विशेष योगदान राहिले.
रस्ते,वीज,पाणीपुरवठा, आरोग्य केंद्रे,आणि शाळा उभारून आदिवासी भागाचा विकास साधला.
मधुकरराव पिचड हे केवळ एक राजकीय नेता नव्हते,तर ते छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,वीर बिरसा मुंडा, आणि वीर राघोजी भांगरे यांच्या विचारांचा वारसा चालवणारे एक व्यक्ती होते.
पिचड हे नेहमीच वंचित आणि शोषित घटकांसाठी आवाज उठवत असत.त्यांनी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कठोर परिश्रम केले.
आदिवासी भागातील आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी वैद्यकीय शिबिरे,दवाखाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारली.त्यांनी
आदिवासी शेतकऱ्यांसाठी विशेष योजना सुरू केल्या व शेतकऱ्यांना शेतीविषयक तांत्रिक मदत पुरवली.
मधुकरराव पिचड हे केवळ नेता नव्हते,तर ते स्वतःच एक विचार होते.त्यांनी आदिवासी समाजामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणले.त्यांच्या विचारांमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक न्याय, महात्मा फुल्यांचा शिक्षणासाठी आग्रह,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समतादृष्टी आणि वीर बिरसा मुंडा यांचा लढाऊ स्वभाव यांचा सुरेख संगम होता.
सर्व समाजाने एकत्र येऊन शासनाकडे विनंती करावी की मधुकरराव पिचड यांच्या जयंती आणि पुण्यतिथी शासकीय पातळीवर साजरी करण्यात यावी.तसेच,त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना किंवा पुरस्कार सुरू करण्यात यावा.
मधुकरराव पिचड यांचे जीवन म्हणजे समाजासाठी एक प्रेरणादायी अध्याय आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे चालवणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

