दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राज्याची वाटचाल अधोगतीच्या दिशेने…
आज नागपूर येथे मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे.कोणाला संधी व कोणाला डच्चू मिळणार ? याविषयी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.१५.१२.८ असे सूत्र ठरले असून महायुतीमधील तिन्ही प्रमुख घटक पक्षांना मान्य आहे.
आज नागपूर येथे राजभवनावर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर दोन वाईट घटनांचे सावट पडले आहे.परभणी येथे भारतीय संविधानाचा झालेला अपमान व त्यानंतर झालेली दंगल,तसेच बीड येथे सरपंच संतोष देशमुख,या तरुणाची अत्यंत निर्घृणपणे झालेली हत्या.या हत्या प्रकरणातील आरोपींना धनंजय मुंडे हे वाचवत असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे.या दोन्ही घटनांना आता जातीय राजकारणाचा रंग देण्यात येत आहे.संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येबाबत स्थानिक आ.सुरेश धस यांनी जे काही वर्णन केले आहे,ते पाहता या प्रकरणाचे गांभीर्य किती आहे,हे स्पष्ट होत आहे.त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येऊ नये,अशी मागणी सर्व थरातून करण्यात येत आहे.पण असंवेदनशील असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार,लोकांच्या या मागणीला धूप घालणार नाहीत.अशा सर्व परिस्थितीत मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे.संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता,त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती ऐकल्यानंतर तळपायाची आग मस्तकात गेली,काय म्हणाले ते पहा,ते म्हणाले,अशा हत्या अनेक जिल्ह्यात होतच असतात.यालाच आपण सत्तेचा माज म्हणतो.त्यांचे सहकारी अजित पवार हे उर्मट व इतरांचा अपमान करण्यात धन्यता मानणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात,त्यामुळे ते धनंजय मुंडे याचा मंत्रिमंडळात समावेश करणार नाहीत,यावर कोणी विश्वास ठेवणार नाहीत.तेवढी संवेदनशीलता त्यांच्याकडे नाही.आज बीड जिल्ह्याची तुलना बिहारमधील जिल्ह्याशी केली जाते,हे चित्र नक्कीच पुरोगामी महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने अधोगती सुरू झाली आहे,यावर शिक्कामोर्तब करणारे आहे.जे सरकार आपल्या बहिणीच्या संसाराला हातभार लावते.आपल्या लाडक्या बहिणींना दरमहा १५००/- रु.ची खिरापत वाटते.त्याच सरकारमधील एक मंत्री आपल्या लाडक्या बहिणीचे कुंकू पुसतो,यासारखे दुसरे दुर्दैव नसावे.अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाल्यास तुम्ही – आम्ही आश्चर्य वाटून घेता कामा नये.

