जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे आर्टिस्ट कॅम्पचे यशस्वी आयोजन,
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या कला अकादमीतर्फे महापालिकेच्या कलाशिक्षक व ख्यातनाम चित्रकारांच्या सहकार्याने जव्हार व परिसरात ११ ते १४ डिसेंबर २०२४ अश्या चार दिवसांचा भव्य आर्टिस्ट कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पच्या माध्यमातून स्थानिक वारसा,ग्रामीण सौंदर्य,तसेच आदिवासी जीवनशैलीला कला माध्यमातून अधोरेखित करण्यात आले.
कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे आणि अजय वाणी यांनी भेट देऊन कलाशिक्षक व चित्रकारांनी साकारलेल्या कलाकृतींची पाहणी केली. जय विलास पॅलेस,हनुमान पॉइंट,शिरपामाळ,जव्हार बाजार,के.व्ही.हायस्कूल व गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार,तसेच वारली चित्रशैलीतील विविध कलाकृतींनी या कॅम्पची शोभा वाढवली.पाहणीदरम्यान उपशिक्षणाधिकाऱ्यांनी कलाकारांचे कौतुक केले.या कॅम्पमध्ये स्थानिक वारली कलाकार दीपक मुकणे यांनी प्रात्यक्षिक सादर करून पारंपरिक वारली चित्रशैलीचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी वारली कलेच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून स्थानिक जीवनशैलीची कंगोरे उलगडले.आदिवासी जीवनशैलीचे अभ्यासक निशांत सिंह यांनी आदिवासी लोकजीवन,अन्नपद्धती,तसेच आदिवासी समाजाच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न,याबाबत कलाशिक्षकांशी संवाद साधला.त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे सहभागी कलाकारांना आदिवासी संस्कृतीबद्दल अधिक चांगली माहिती मिळाली.
या कॅम्पमध्ये तयार करण्यात आलेल्या उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन १८ ते २४ फेब्रु.२०२५ या कालावधीत नेहरू सेंटर कलादालन,वरळी येथे आयोजित करण्यात येणार आहे.या प्रदर्शनाद्वारे ग्रामीण व आदिवासी जीवनशैलीचे सौंदर्य आणि वारसा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.
हा कॅम्प उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ,उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.कला प्राचार्य दिनकर पवार यांच्या नेतृत्वाखाली निदेशक मंजिरी राऊत,भूषण उदगीरकर, योगेश मोरे,प्रफुल्लता कुंभार आणि निनाद पाटील यांनी कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
याशिवाय,स्थानिक निवासी अनिल दवणे यांनी कॅम्पच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
हा आर्टिस्ट कॅम्प बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कलाशिक्षक व स्थानिक कलाकारांमधील सहकार्याचे उत्तम उदाहरण ठरला.या कॅम्पद्वारे स्थानिक वारसा आणि आदिवासी संस्कृती जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी महत्त्वाचे योगदान मिळाले आहे.

