संजय लांडगे, वाडा शहर,
वाडा येथे भाताच्या भाऱ्यांना अज्ञात व्यक्तीने लावली आग,
वाडा तालुक्यातील जामघर येथे दोन शेतकऱ्यांच्या खळ्यामध्ये भाताच्या भाऱ्यांना अज्ञात इसमाने आग लावण्याची घटना आज दुपारच्या सुमारात घडली आहे.
या घटनेत पाचशेच्यावर भाताचे भारे जळून खाक झाले.किसन गणपत पाटील व दिनेश बापू पाटील,या दोन शेतकऱ्यांचे लाखो रु.चे नुकसान झाले आहे.याबाबत तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना पंचनामा करण्यासाठी कळवण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते.या तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला भात शेतीचा व्यवसाय करत असतात. वर्षभराचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून हे शेतकरी भात लागवड करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असतात.आज दुपारी अज्ञात इसमाने भाताचे पाचशे भारे पेटवल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला गेला आहे.त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून,त्यांचे लाखो रु.चे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित घटनांचा पंचनामा करून नुकसान झालेली भरपाई शासनाकडून मिळावी, यासाठी तहसीलदारांकडे या शेतकऱ्यानी मागणी केली आहे.

