संदीप लहांगे,डहाणू,
जिल्हा परिषद शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न,
पालघर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे शाळांतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ पालघर आर्यन हायस्कूलचे मैदान येथे पार पडल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,अध्यक्ष प्रकाश निकम,कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे,समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर व जिल्हा परिषद सदस्य निता पाटील,सारिका निकम,भावना विचारे,पंचायत समिती सभापती शैला कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धा पार पडल्या,.
या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचे मी मनापासून कौतुक करतो,तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या, त्यांना सांभाळणाऱ्या शिक्षकांची जबाबदारी ही त्यांच्या पालकांपेक्षा मोठी असून त्या शिक्षकांचे करावे तितके कौतुक कमी आहे, हे शिक्षक या समाजातील सर्वात मोठी समाजसेवा करत आहेत असे प्रतिपादन यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले.
या स्पर्धांमध्ये पालघर जिल्हयातील १६ शाळांतील २५१ दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले होते.
पालघर जिल्ह्यात सात अनुदानित व नऊ विनाअनुदानित अशा १६ शाळांमध्ये ८५० दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १९९२ पासून ३ डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून मतिमंद,कर्णबधिर,अंध व विकलांग,अशा प्रवर्गानुसार धावणे,गोळाफेक,लांब उडी, अंध विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ, लगोरी फोडणे,अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण भावसार यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.
यावेळी लायन्स क्लबचे लायन राकेश सिंग,ज्योती सिंग, दीपक भगत उपस्थित होते.त्यांच्या संस्थेतर्फे गरजू मुलासाठी मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे उपलब्ध करण्यात येणार आहे.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड होणार आहे.अशी माहिती समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आली.

