वसंत भोईर,वाडा ग्रामीण,
भाताला हमीभाव कागदावरच ; अद्याप भातखरेदी सुरूच झाली नाही…
गेल्या काही वर्षापासून शेतीव्यवसाय अनिश्चिततेच्या वातावरणात हेलकावे खात आहे.पावसाचे उशिराने आगमन,अतिवृष्टी,अवकाळी पाऊस,परतीच्या पावसाचा फटका,नापिकी व सरकारचे कृषीविषयक दिशाहीन धोरण, इ.कारणामुळे शेती व्यवसाय उतरणीला लागला आहे.अशा परिस्थितीत सरकार उत्पादित शेतमालाला हमी भाव देणे व वेळेवर भातखरेदी केंद्रे सुरू करणे,या दोन महत्वाच्या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
खाजगी बाजारपेठेत भाताला भाव मिळत नसल्यामुळे राज्य शासनाने पालघर जिल्ह्यात आदिवासी विभाग महामंडळाच्या माध्यमातून वाडा,मोखाडा तालुक्यातील १० खरेदी केंद्रे स्थापन केली आहेत.या खरेदी केंद्रावर सुमारे १ हजार ४६५ शेतकऱ्यांनी भात विक्रीसाठी नोंदणी केली.नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना २ हजार ३०० रु.प्रति क्विंटल हमीभाव देण्यात येणार आहे.
मात्र अद्याप या केंद्रांवर खरेदी-विक्री सुरू झाली नसल्याने सध्या तरी हमीभाव हा कागदावरच आहे.भात विक्रीसाठी शेतकऱ्यांना अजून बराच काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.रब्बी हंगाम सुरू झाला असल्यामुळे अनेक गरजू शेतकरी मिळेल,त्या भावाने खाजगी व्यापाऱ्यांना भाताची विक्री करून भाजीपाल्याची लागवड करत आहेत.
वाडा तालुक्यात खरीप हंगाम संपून सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे.मात्र वाडा तालुक्यात हमीभाव केंद्रे सुरू न झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत.सरकारने लवकरात लवकर या खरेदी केंद्रावर भातखरेदी करण्यास सुरुवात करावी,अशी मागणी करण्यात येत आहे.

