सद्दाम शेख मोखाडा,
पालघर जिल्ह्यात यंदा आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता,
फेंगल चक्रीवादळामुळे राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.सध्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे परिसरातील आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
यंदाक्या हंगामात परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्यामुळे आंबा पिकावर परिणाम होऊन आंब्यांची मोहोर प्रक्रिया लांबली आहे.दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा,तसेच परतीचा पाऊस,वातावरणात होणारा बदल,याचा परिणाम बागायती पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.साधारणपणे सप्टें. महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात होते,मात्र या वर्षी पावसाने नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पाऊसाने हजेरी लावली.अशावेळी फेंगल
चक्रीवादळामुळे हंगामी पिकांना फटका बसला आहे.गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंब्याला मोहोर येण्याऐवजी पानातील रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.साधारणतः नोव्हें. महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडीला सुरुवात होऊन आंबा पिकाला मोहर येण्यास सुरुवात होत असते.मात्र यंदा थंडी न पडल्यामुळे आंब्याच्या झाडांना उशिराने मोहर येण्याची शक्यता आहे.
मोहोराला पोषक असे थंडीचे वातावरण मिळाल्यास मोहोर मोठ्या प्रमाणात येतो.परंतू ऐनवेळी हवामानात झालेल्या बदलांमुळे आंब्याच्या मोहोराचे नुकसान होत आहे.त्यामुळे आंब्याचे उत्पादन घटेल,अशी भिती सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.

