सद्दाम शेख,मोखाडा,
मोखाडा तालुका ; रोजगार हमी योजनेचे तीन तेरा,आदिवासींच्या स्थलांतरणाला वेग,
ग्रामीण भागातील आदिवासी नागरिकांचे स्थलांतर थांबावे, स्थानिक पातळीवर पुरेसा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सरकारने रोजगार हमी योजना कार्यान्वित केली.या योजनेतून “ मागेल त्याला काम व पंधरा दिवसात दाम ” असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही महत्वकांक्षी योजना कार्यान्वित करण्यात आली परंतु सुरवातीची चार ते पाच वर्षात ही योजना यशस्वीपणे राबवण्यात आली.नंतर मात्र ग्रामिण भागात योजना अंमलात आणणारे अधिकारी व कर्मचारी यांनी योजनेचा मूळ उद्देश गुंडाळून ठेवला.मोखाडा तालुक्यात जवळपास १५ हजाराहून अधिक जॉंबकार्डधारकांची संख्या असुन वर्षभरात केवळ सहा ते सात हजार कार्डधारकांना या योजनेंतर्गतकाम मिळत असून उर्वरित आठ हजार कार्डधारक वर्षानुवर्षे रोजगारापासून वंचित आहेत.त्यांच्यासमोर स्थंलातर करण्याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाही. प्रशासनाची उदासीनता रोजगार हमी योजनेच्या मुळावर आली असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
कुपोषणग्रस्त तालुका अशी ओळख असलेल्या मोखाडा तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून कुपोषणाचे प्रमाण कमी झाले असले तरी देखील ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबांना अन्न,वस्त्र,निवारा तसेच इतर गरजांसाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे रोजगारासाठी किमान दोन महिने स्थंलातर करावे लागते.परिणामी त्यांचे घराकडे व मुलाबाळांच्या शिक्षणाकडे कायमचं दुर्लक्ष होत असते.त्यामुळे जर तालुक्यातील आदिवासी जनतेला स्थानिक पातळीवर पुरेसा रोजगार उपलब्ध झाला तर गाव पाड्यातील नागरीकांचे स्थंलातर कायमस्वरूपी थांबू शकेल. परंतू शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बुरसटलेल्या मानसिकतेमुळे अनेक आदिवासी बांधवांना रोजगार मिळत तर नाहीच पण मिळालाच तर कामाचा मोबदला मिळविण्यासाठी वेळप्रसंगी मोर्चे,आंदोलन करावी लागतात.त्यामुळे स्थानिक पातळीवर मिळणारा रोजगार नको,अशा निर्णयाप्रत ते आले आहेत.आजच्या घडीला तालुक्यातील काही भागात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरू असली तरी नोव्हें. महिन्यांपासून गावपाड्यातील मजूर आपले व आपल्या मुलाबाळांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी स्थंलातरीत होऊ लागली आहेत.डिसेंबर अखेरपर्यंत अनेक गाव पाड्यातील घरे ओस पडतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
राज्यभरात रोजगार हमी योजना अंतर्गत विविध शेती आदी विकासकामे करण्यात येत असतात. ” मागेल त्याला काम १५ दिवसात दाम,” अशी तरतूद करण्यात आली आहे.परंतु मागेल त्याला कामही मिळत नाही आणि वेळेवर दामही मिळत नाही.अशी ही योजना कशीबशी चालू आहे.

