वसंत भोईर,वाडा ग्रामीण,
वाडा तालुक्यातील अनेक ग्रा.पं.चा गलथान कारभार,
वाडा तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीमध्ये जन्म-मृत्यूच्या नोंदी नसल्याचे श्रमजीवी संघटनेकडून उघड करण्यात आले असून त्यांनी तहसीलदारांकडे ग्रामपंचायतींच्या गलथान कारभाराची यादी सादर केली आहे. यादीची पडताळणी केल्यानंतर तहसीलदारांनी नोंदी करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना पारीत केले.
ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिका-याकडून जन्म-मृत्यूची नोंद वेळीच करणे,हे काम आहे.मात्र तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील जन्म मृत्यूच्या घटना निदर्शनास येऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत घटनेची नोंद केली जात नाही.ज्यावेळी रहिवासी व्यक्तीला विविध कामासाठी दाखला आवश्यक असतो,त्यावेळी ती व्यक्ती ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवते.दाखला देतांना नोंद करतांना त्या गरजू व्यक्तीला अनेक पुरावे सादर करावे लागतात.काही ग्रामपंचायत अधिकारी गरजू नागरिकाना चकरा मारायला लावतात.तसेच विविध कारणे दाखवून नाहक भुर्दंड द्यायला भाग पाडतात,अशी अडवणूक होऊ नये व गरजेनुसार व्यक्तीचे काम लगेच व्हावे,यासाठी श्रमजीवीचे राज्य सचिव विजय जाधव यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून जन्म मृत्यूच्या नोंदी घेण्याची विनंती केली आहे.
वाडा तालुक्यातील एकूण ८६ ग्रामपंचायतीत २७ हजार ५२२ जन्म नोंदी घेतल्या नसल्याचे जाधव यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले.यापैकी सर्वात कमी नोंदी वडवली पौलबारे या ग्रामपंचायतीत केवळ ०९ नोंदी झालेल्या नाहीत,तर सर्वात जास्त अंभई खुटल आमगाव ग्रामपंचायतीत पंधराशे व्यक्तींच्या जन्म नोंदी झालेल्या नाहीत. ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणाचा हा कळस असल्याचे सांगण्यात आले,याची दखल तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी घेऊन त्वरीत नोंदी करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना दिले आहेत.
अत्यंत मेहनत घेऊन तहसीलदारांनी या नोंदीची छाननी करून २० हजार ३२९ नोंदी घेण्याचे ग्रामपंचायतींना आदेश दिल्याबद्दल श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेकभाऊ पंडीत यांनी आभार मानले आहेत.
कोट:
गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्याकडून त नोंदीमधील चुका दुरूस्त करून घेतल्या व ग्रामपंचायतीच्या दप्तरात नोंदी करण्याचे आदेश दिले.उर्वरित सात हजार नोंदीमधील त्रुटी दूर करण्यात येणार आहेत.
भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार वाडा.

