नवीन पाटील,सफाळे,
जिल्हा प्रशासनाचा अजब कारभार ; तब्बल ३१ गावांचा भार एकाच तलाठ्यावर…
पालघर जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया रखडल्यामुळे अनेक गावातील तलाठ्यांची पदे रिक्त आहेत.सफाळे पूर्व व पश्चिम भागातील तीन मंडळ अधिकाऱ्यांची जबाबदारी सध्या एकाच तलाठ्याकडे असून यामुळे ३१ गावांचा भार त्यांच्यावर देण्यात आला आहे.
जमिनीची व इतर कामे वेळेवर होत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
पालघर जिल्ह्यात तलाठ्यांची कमतरता भासत असून अनेक ठिकाणी तलाठ्यांअभावी शेतकऱ्यांच्या शेतीविषयी भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक होत नाही.तलाठ्यांना इतरही कामे असल्यामुळे तलाठ्यांची चांगलीच दमछाक होत असते. संपूर्ण जिल्ह्यात असा प्रकार सुरू असून शेतकऱ्यांची शेतीची कामे व विविध दाखल्यांवर तलाठ्यांच्या सहीसाठी विद्यार्थी व पालकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. तलाठ्यांची संख्या वाढवण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून करण्यात येत आहेत.
बॉक्स कोट…
शेतकऱ्यांची कामे तातडीने मार्गी लागावी,या उद्देशाने महसूल विभागाने एकापेक्षा अधिक कामांसाठी तलाठी सज्जांची निर्मिती केली. एका सज्जासाठी एक तलाठी असे धोरण आखले, मात्र पालघर तालुक्यातील सफाळे परिसरात तीन मंडळ अधिकारी यांच्या विभागातील सात सजांची जबाबदारी एका तलाठ्यावर सोपवण्याली आहे. त्यातच तालुका व जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कामांसाठी तलाठ्यांना जावे लागत असल्याने शेतकऱ्यांची कामे होत नाहीत.
कोट…
पालघर जिल्ह्यात तलाठी पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे हा प्रकार सर्व ठिकाणी सुरू आहे. तलाठी भरती झाल्यास रिक्त जागी तलाठी पदे भरली जातील.
– रमेश शेंडगे, तहसीलदार, पालघर

