दीपक मोहिते,
नव्या सरकारमध्ये पंकजा मुंडे क्रमांक दोनच्या नेत्या असतील,
देवेंद्र फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ अद्याप आकाराला येऊ शकलेले नाही.महायुतीचा मुख्य घटक पक्ष असलेले भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या दोघांमध्ये चुरशीची रस्सीखेच सुरू आहे.ज्या गृहखात्यासाठी शिंदे अडून बसले होते,ते त्यांना मिळणार नाही,हे जवळपास निश्चित झाले आहे.याव्यतिरिक्त भाजप महसूल व जलसंपदा ही दोन खातीही स्वतःकडे ठेवेल,अशी चर्चा आहे.अर्थ व ग्रामविकास,ही दोन्ही खाती अजित पवार गटाकडे जातील,तर नगरविकास, सार्व.बांधकाम व शालेय शिक्षण,ही खाती शिंदे गटाला देण्यात येणार आहेत.
एकूण ४३ मंत्रिपदापैकी २० ते २१ भाजपला तर उर्वरित २१ पदे पवार,शिंदे गट व १ पद अपक्षाला,असे वाटप होईल.नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळात शिंदे गटाचे राठोड,दीपक केसरकर व अब्दुल सत्तार,या तिघांना डच्चू देण्यात येईल,असा अंदाज आहे.अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळात घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाखूष आहेत.त्यांना संधी देण्यात आली नाही तर त्यांच्या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम चेहरा नसेल,त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.छगन भुजबळ हे वयोमानामुळे खुप थकले आहेत,कदाचित त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही,पण त्यांना मंत्रीमंडळाबाहेर ठेवणे,महायुतीला परवडणारे नाही.त्यांना संधी न मिळाल्यास ते त्यांच्या समता परिषदेच्या माध्यमातून ओबिसीचे हत्यार उपसत राज्यभरात रान उठवतील,त्यामुळे सद्यस्थितीत त्यांना व पर्यायाने त्यांच्या ओबीसी समाजाला दुखावणे महायुतीला परवडणारे नाही.त्यामुळे अजित पवार गटाच्या जुन्या मंत्र्यांना पुढे चाल मिळण्याची शक्यता आहे.देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे,शिवेंद्रराजे भोसले व गोपीनाथ पडळकर यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे लागणार आहे.या निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर ओबीसींचा चेहरा म्हणून महत्वाची जबाबदारी सोपवली होती.पंकजा मुंडे यांनी राज्याच्या ओबीसी बहुल भागात तब्बल ३०० सभा घेतल्या,त्याचे निवडणुकीच्या निकालात सकारात्मक परिणाम दिसून आले.या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना विशेष हेलिकॉप्टर देऊ केले होते.त्यामुळे मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांचे क्रमांक दोनचे स्थान असेल.प.महाराष्ट्रात या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व असे यश मिळाले.मराठा समाजाचे जरांगे पाटील यांनी यावेळी भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रचंड रान उठवले होते.अशी परिस्थिती असतानाही मराठा समाजाने भाजपला भरभरून मते दिली. त्यामुळे भाजपला प.महाराष्ट्रात अनेक जागा जिंकता आल्या व भक्कम पाया रचता आला.त्यामुळे तीन वेळा निवडणुका जिंकणारे शिवेंद्रराजे भोसले यांना मराठा चेहरा म्हणून संधी दिली जाईल.धनगर समाज हा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांमुळे भाजपवर सध्या नाराज आहे,तो अधिक दुखावता कामा नये,यासाठी पडळकर यांनाही संधी देण्यात येईल,असा अंदाज आहे.

