दीपक मोहिते,
फ्रंटलाईन,
आता वेध महानगरपालिका निवडणुकीचे…
जून २०२० पासून वसई – विरार शहर महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवटीचा अंमल आहे.केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राज्यात महायुती पुन्हा सत्तेत आल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे.शिंदे सरकारने या निवडणुका विविध कारणावरून पुढे ढकलल्या.या निवडणुकांमध्ये महायुतीचा पराभव होईल,या भितीतून फडणवीस व शिंदे यांनी कोरोना व नंतर ओबीसी प्रश्नावरून त्या लांबणीवर टाकल्या.या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात,यासाठी सरकार आता न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका निकालात काढण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करणार असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे राज्यातील तमाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात होतील,असा अंदाज आहे.
मुंबई,ठाणे,भिवंडी,कल्याण – डोंबिवली,उल्हासनगर,
कुळगाव – बदलापूर,अंबरनाथ सह वसई – विरार शहर महानगरपालिका इ.च्या निवडणुका होणार आहेत.वसई – विरार शहर महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीचे तब्बल दहा वर्षे वर्चस्व होते.गेली चार वर्षे शिंदे सरकारने प्रशासकीय राजवटीला सतत मुदतवाढ देत अप्रत्यक्षपणे महानगरपालिकेची सूत्रे आपल्या हाती ठेवली.या काळात महायुतीच्या सरकारने मंत्रालयातील आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना या महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठवून महानगरपालिकेची तिजोरी रिकामी केली.आज या महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत डबघाईला आली आहे.गेल्या चार वर्षात या महानगरपालिकेत आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या तीन ते चार पिढ्या बसून खातील,इतका रग्गड मलिदा लुटला.हे सर्व अधिकारी ठाण्याहून येणाऱ्या आदेशाचे पालन करत होते.” तुमचे ताट तर आमची वाटी,” अशा नियमानुसार ठाण्यातील राजकारणी व मनपातील अधिकारी महानगरपालिकेची तिजोरी साफ करत राहिले.नवनिर्वाचित आ.राजन नाईक व आ.स्नेहा दुबे – पंडित या दोघांनी प्रशासकीय राजवटीत मनपाच्या
तिजोरीची जी लुटालूट झाली,त्याची सर्वप्रथम चौकशी व्हावी,अशी मागणी केली पाहिजे.कारण या चार वर्षाच्या काळात मंत्रालयातील अधिकारी वारंवार प्रतिनियुक्तीवर का येत होते,याचा शोध घेतला तर त्यांना भयावह वास्तव नक्कीच अनुभवायला मिळेल.या काळात अग्निशमन,इलेक्ट्रिक,वैद्यकीय सेवा व महिला बालकल्याण समिती व अन्य काही विभागात जी खरेदी झाली त्याची माहिती घेतल्यास सर्वसामान्य करदात्यांच्या पैश्याची कशी लूट झाली हे समोर येईल.पण हे आमदार तशी मागणी करतील,असे वाटत नाही.कारण ” आपलेच दात,आपलेच ओठ,” या म्हणीनुसार त्यांना वागावे लागणार आहे.अशा सर्व परिस्थितीमध्ये या निवडणुका होत आहेत.या निवडणुकीत महायुती विरुद्ध बहुजन विकास आघाडी असाच सामना होईल,असा अंदाज आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस,यांची ताकद वसई तालुक्यात नगण्य आहे.शिवसेना ( उबाठा ) ही निवडणूक महाविकास आघाडी ऐवजी स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.

