नादुरुस्त व कालबाह्य एसटी बसेसमुळे प्रवासी हैराण,खा.डॉ.सवरा यांनी लक्ष घालावे,
जव्हार ( प्रतिनिधी )
जव्हार,मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यांतील नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा एकमेव पर्याय असलेल्या जव्हार एसटी आगारातील बसेसची अवस्था दयनीय झाली आहे.या बससेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना सतत विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.विस्कळीत बससेवा,वेळेत येजा न करणाऱ्या बसेस, प्रवासादरम्यान बसेस नादुरुस्त होणे,अशा समस्यांमुळे नागरिक त्रस्तआहेत.
जव्हार एसटी आगारातून दररोज प्रवाशांसाठी ५३ फेऱ्या चालवण्यात येतात.यामध्ये ३८ बसेस प्रवासी वाहतुकीसाठी तर १८ बसेस मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आहेत.मात्र,जवळपास ५६ बसेसपैकी ५० बसेस जीर्ण व कालबाह्य झाल्या आहेत.
या बसेसच्या तुटलेल्या खिडक्या,गळकी छते, तुटलेल्या खुर्च्या अशा समस्यांमुळे प्रवासी नाराज आहेत.पावसाळ्यात गळणाऱ्या छतामुळे प्रवाशांची गैरसोय होत असते.बसेसच्या खराब अवस्थेमुळे दररोज १० ते १५ बसेस आगारातच दुरुस्तीसाठी थांबून राहतात,परिणामी नियोजित वेळापत्रक बिघडते.
दुरुस्तीची साधने,टायर बदलण्यासाठी आवश्यक अवजारे नसल्याने बसेसची वेळेवर देखभाल होऊ शकत नाही.स्टेपनी नसल्याने रस्त्यात पंक्चर झालेल्या बसेस बंद पडतात,आणि प्रवाशांना इतर बसमध्ये शिफ्ट करावे लागते.
पालघर विभागाला नवीन २०० बसेस,तर जव्हार आगारासाठी ५० नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात.
तसेच रिक्त पदांवर पालघर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्याने भरती करण्यात यावे.
चालक,वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज विश्रामगृह व स्वच्छतागृह उभारण्यात यावे.
विक्रमगड,मोखाडा आणि खोडाळा येथे नवीन बस स्थानके उभारण्यात यावीत, अशा विविध मागण्या एसटी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.या प्रकरणी पालघरचे खा.डॉ.सवरा यांनी लक्ष घालावे,अशी अपेक्षा एसटी प्रवासी व्यक्त करत आहेत.

