संजय लांडगे,वाडा शहर,
विद्यार्थ्यांनी शालेय परीक्षेसोबत इतर स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हावे-खा. डॉ.सावरा,
शालेय विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासह इतर स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन विविध क्षेत्रात प्रगती करावी व आपल्या परिवाराचे तसेच देशाचे नाव उज्वल करावे,असे आवाहन खा.डॉ. हेमंत सावरा यांनी विद्यार्थ्यांना केले.वाडा शहरातील नुरबाग हॉल येथे आयोजित जिल्हास्तरीय सामान्य ज्ञानस्पर्धा परीक्षेच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
क्रांतिज्योत बहुउदेशीय सामाजिक संघटना व आय. टी.जिनियस कॉम्प्युटर एज्युकेशन,आयोजित थोर महापुरुषांच्या जीवन चरित्रावर आधारित जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय व्हावी,ग्रामीण,दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना एमपीएससी – युपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षेची माहिती मिळावी,या उद्देशाने स्पर्धांचे आयोजन करीत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष कल्पेश ठाणगे यांनी सांगितले.
संजय कामडी,विकास कांबळे, गोपीनाथ अहिरे,अंबादास जमादार,नवनाथ शिंदे आदी प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ५० शिक्षकांनी या उपक्रमात पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.या स्पर्धेत जिल्ह्यातून ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
ही स्पर्धा पाच गटात घेण्यात आली. प्रत्येक गटातून तीन विजेत्यांना निवडण्यात आले.या विजेत्यांना खा.डॉ.हेमंत सावरा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी पत्रकार अशोक पाटील यांना आदर्श पत्रकार, डॉ.सुवर्णलता गावकर यांना आरोग्य विभागाचा,नरेश भेकरे यांना सामाजिक क्षेत्रातला तर सुनिल कामडी यांना शेती क्षेत्रातील जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
हा सोहळ्याला पंचायत समितीचे पदाधिकारी व तालुक्यातील प्रतिष्ठित व्यती, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थिती होते.

