दीपक मोहिते,
हवामानातील बदलामुळे कृषी उत्पन्नावर विविध रोगाचे आक्रमण,
राज्यात गेल्या पाच दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे कृषी क्षेत्राला जबर फटका बसला आहे.गहू तुर,कांदा,हळद सोयाबीन द्राक्ष व अन्य कृषी उत्पन्नावर विविध रोगाचे आक्रमण झाले आहे.मात्र या ज्वलंत समस्येबाबत राज्याचे कृषी विभाग मात्र उदासीन आहे.विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारने या नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यावा,अशी मागणी केली आहे.
वातावरणात झालेला बदल,हा शेतकऱ्यांना मारक ठरला असून अनेक पिकांवर रोग पडला आहे.यवतमाळ जिल्ह्यात हळदी पिकावर करपा रोग पडला असून या जिल्ह्यात हजारो हे.जमिनीवर हळदीची लागवड करण्यात येत असते.या रोगाच्या आक्रमणाने जिल्ह्यातील हजारो शेतकरी अडचणीत आले आहेत.कृषी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यातही अशीच परिस्थिती बघायला मिळते.या जिल्ह्यात अधून मधून पडणाऱ्या पावसाने कांदे मका गहू व द्राक्षाचे अतोनात नुकसान झाले आहे.या जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला आहे.द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने घाला घातल्यामुळे द्राक्ष उत्पादकांवर हे अस्मानी संकट कोसळले आहे.अचानक आलेल्या या पावसाने उघड्यावर असलेल्या सोयाबीन व मका पिकांना धोका निर्माण झाला आहे.तसेच गव्हाचे बीजही नष्ट होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

