दीपक मोहिते,
” हल्लाबोल,” भाग क्र.२
ग्रामीण शिक्षण व्यवस्था,
ग्रामीण भागातील जि.प.च्या प्राथमिक शाळा वाचवण्याचे नव्या सरकारपुढे मोठे आव्हान,
राज्याचे शिक्षण विभाग,हे कायम निद्रावस्थेत असलेले पाहायला मिळते.गेल्या काही वर्षात या विभागाचा कारभार इतका सैरभैर झाला आहे,की ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था मोडीत निघते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.त्यास अधिकारीवर्गाचा भ्रष्ट कारभार व लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत ठरली आहे.
गेल्या काही वर्षात राज्यात खाजगी शाळांचे वारेमाप पीक आले आहे.राज्य सरकारच्या या विभागाने खाजगी शिक्षण संस्थांना मुक्तहस्ते परवानग्या दिल्यामुळे खाजगी शाळा पावसाळ्यात रानात उगवणाऱ्या छत्र्यासारख्या उगवल्या.परिणामी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद हळूहळू मृत्युशय्येवर जाऊ लागल्या.आजच्या घडीला राज्यातील हजारो शाळांनी अखेरचा श्वास घेतला तर उर्वरित शाळा आचके देत आहेत.पालघर जिल्हाही त्याला अपवाद ठरू शकला नाही.गेल्या काही वर्षात जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळा इतिहासजमा झाल्या.राज्यसरकारचे शिक्षण विभाग देखील आता विद्यार्थ्यांची पुरेशी पटसंख्या नसल्याच्या कारणावरून या शाळांचे गळे आवळू लागले आहे.ज्या शिक्षण व्यवस्थेने ग्रामीण भागातील कोट्यवधी मुलांसाठी शिक्षणाची कवाडे उघडली,तेच मायबाप सरकार आता या शाळा बंद करू लागले आहे.वास्तविक मुले जिल्हा परिषद शाळापासून फारकत का घेऊ लागले,त्यांचे पालक आर्थिक ऐपत नसताना आपल्या मुलांना खाजगी शाळेत का पाठवू लागले व शाळाबाह्य विद्यार्थांच्या संख्येचा वेलू गगनावर का गेला ? याविषयी सरकारने शिक्षणतज्ञांचा अभ्यासगट नेमून आढावा घेण्याची गरज होती.वास्तविक लोकप्रतिनिधीनी या ज्वलंत प्रश्र्नी लक्ष घालयला हवे होते. पण गेल्या पाच दशकात याविषयी विशेष काही झाले नाही.त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील साक्षरतेचे प्रमाण वाढू शकले नाही. केरळ राज्याने काही वर्षांपूर्वी आपल्या राज्यात १०० % साक्षरतेचे उद्दिष्ट गाठले,ते त्यांनी आजही टिकवून ठेवले आहे.पण आपण ते करू शकलो नाही.आपल्या सरकारने ज्या काही उपाययोजना केल्या,त्या अत्यंत चुकीच्या अशा होत्या.व्यवस्था सुधारण्याला प्राधान्य देण्याऐवजी त्याचा गळा घोटण्यात सरकारने धन्यता मानली.पाश्चात्य देशात सरकार शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत असते.जपानसारख्या देशात एका खेड्यातील एकमेव मुलीला शाळेत जाता यावे,यासाठी सरकार तिच्या शाळेच्या वेळात ट्रेन सोडते,त्यानंतर तिची शाळा सुटली की त्या मुलीला घेऊन ती ट्रेन पुन्हा तिला तिच्या मूळगावी आणून सोडते.या प्रवासात त्या ट्रेनमध्ये ती एकमेव प्रवासी असते.आपल्या देशात शेकडो मुले दळणवळणाची साधने नसल्यामुळे आपले शिक्षण अर्ध्यात सोडतात.त्यामुळे सर्वाधिक शाळाबाह्य मुले आपल्या देशात असल्याचे दिसून आले आहे.

