दीपक मोहिते,
” रस्सीखेच,”
पालघरचे पालकमंत्रीपद पुन्हाकडेच,रविंद्र चव्हाण यांची पुन्हा वर्णी लागणार…
पालघरचे पालकमंत्री पद हे भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.भाजपचे रविंद्र चव्हाण यांच्याकडे पालघर व सिंधुदुर्ग,अशा दोन जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते.पण आता नितेश राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्यामुळे सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद त्यांच्याकडे सोपवले जाणार आहे.त्यामुळे पालघरच्या पालकमंत्रीपदी रविंद्र चव्हाण यांना पुढे चाल मिळण्याची दाट शक्यता आहे.शिंदे गटाचे पालघरचे आ.राजेंद्र गावित हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत,पण जिल्ह्यातील सर्व निवडणुका एकहाती जिंकणाऱ्या रविंद्र चव्हाण यांना पहिली पसंती मिळेल असे वाटते.
पालकमंत्री म्हणून रविंद्र चव्हाण यांनी वरील दोन्ही जिल्ह्यात सरस कामगिरी केली,तसेच ते देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात चांगले खाते व पालघरचे पालकमंत्रीपद देण्यात येईल,अशी सूत्रांची माहिती आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप पालघर जिल्ह्यात आपले पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करणार आहे.सध्या पालघर जिल्ह्यावर महायुतीचे निर्विवाद वर्चस्व आहे.भविष्यात महायुती तुटली तर जिल्ह्यावर आपले वर्चस्व राहण्यासाठी भाजप अशाप्रकारची खेळी खेळत आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वेगळ्या खेळीमुळे डहाणूवासियाचा वाढवण बंदराविषयी असलेला राग व रोष नाहीसा झाला होता व भाजपच्या डॉ.हेमंत सवरा यांना या मतदारसंघातही चांगले मताधिक्य मिळू शकले.दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही नारायण राणे यांच्या विजयातही त्यांचा सिंहाचा वाटा होता.त्यांच्या या कामगिरीची दखल भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी घेतली आहे.या सर्व पार्श्वभूमीवर पालघरच्या पालकमंत्रीपदी त्यांची वर्णी लागेल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

