दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आता मलईदार खात्यासाठी तीन इंजिनच्या सरकारमध्ये मॅरेथॉन स्पर्धा सुरू…
निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठ दिवस झाले तरी मुख्यमंत्री कोण ? व कोणती खाती कोणाला ? या दोन प्रश्नाची उत्तरे शोधण्यात महायुती अपयशी ठरली आहे.मुख्यमंत्रीपद भाजपला द्यायचे ठरल्यानंतरही उमेदवाराचा चेहरा कोण ? हे जाहीर करण्यात भाजपचे केंद्रीय नेते मागेपुढे का करत आहेत,याचा उलगडा होत नाही.एकनाथ शिंदे हे मुंबईला परतले असले तरी त्यांचा राजकीय आजार अद्याप आटोक्यात आल्याचे दिसत नाही.अडीच वर्षांपूर्वी आपण जो डाव खेळलो,तो डाव आपल्यावर बुमरॅग होईल,असे त्यांना वाटले नव्हते.पण तो अखेर उलटलाच,” उसके घर देर है,पर अंधेर नही,” याची प्रचिती एकनाथ शिंदे यांना गेल्या आठ दिवसात अनुभवायला मिळाली.मुख्यमंत्रीपदाचा चेंडू आता भाजपच्या जाळ्यात गेला असल्यामुळे यावर निर्माण झालेली अनिश्चितता संपुष्टात आली आहे.असो,आता धमासान सुरू झाले आहे ते गृह,महसूल, सार्व.बांधकाम,नगरविकास,
जलसंपदा,ही पाच मलईदार खाती कोणाला मिळणार यावरून…भाजपने गृह व नगरविकास या दोन खात्यावर आपला दावा केला आहे.पण एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याचा हट्ट धरला आहे,तर देवेंद्र फडणवीस यांनी हे खाते आपल्या छातीला घट्ट आवळून धरले आहे.तर अर्थ व सार्व.बांधकाम या दोन खात्याचे आम्ही कायम वारसदार आहोत,असे अजित पवार गटाचे म्हणणे आहे.अजित पवार यांची गेल्या काही वर्षांपासून अर्थमंत्री म्हणून या खात्यावर मजबूत पकड आहे.” निधिवाटप,” हे एक शस्त्र असून अजित पवार हे या अस्त्राचा बेमालूम वापर करत आले.हे करत असताना अजित पवार हे,” आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्ट्या,” धोरण राबवत असल्यामुळे हे खाते अजित पवार गटाकडे जाता कामा नये,असा भाजप आमदारांचा आग्रह आहे.महसूल हे देखील अत्यंत महत्वाचे खाते असून ते भाजपकडेच जाण्याची शक्यता आहे.जलसंपदा खात्याची ख्याती दूरवर पसरली आहे,या खात्यात किती प्रचंड भ्रष्टाचार झाला,हे आपण सगळ्यांनी पाहिले,ते खाते शिंदे गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे.सध्या या पाच मलईदार खात्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही खात्याची चर्चा होत नाही,कारण या खात्यात फारसा राम नाही,शिक्षण खाते,हे अडगळीत पडलेल्या आमदाराची सोय म्हणून ओळखले जाते.हे खाते सतत विविध कारणांनी प्रकाशझोतात असते,या खात्याच्या दिशाहीन व अनागोंदी कारभारामुळे या खात्याचा मंत्री हा कायम टीकेचा धनी होत असतो.मलईदार खाती आपल्याला मिळावी,यासाठी सध्या तीन इंजिनच्या सरकारमध्ये मॅरेथॉन २०२४ सुरू झाली आहे.पाहूया कोण अंतिम विजेता ठरतो ते….

