दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
शिंदे यांचा आजार संपला ; त्यांचे हेलिकॉप्टर दरे गावातून थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानकपणे उद्भवलेला आजार,आज अचानक तो बरा झाला व ते हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले.त्यांच्या या आजाराने मुंबईतील वैद्यकीय व्यवस्थेवर आता प्रश्न उपस्थित झाला आहे.ज्या आजारावर केवळ दरे गावातच उपचार होऊ शकतो,असा कोणता आजार त्यांना जडला होता,हे फक्त त्या ईश्वरालाच माहित असले पाहिजे.
पण झाले ते एकप्रकारे चांगलेच झाले,असे म्हणावे लागेल.आम्हा महाराष्ट्राच्या जनतेचा जीव अक्षरशः भांड्यात पडला.असो,पण आज अचानक त्यांना घाईघाईने मुंबई का गाठावी लागली,हे कोडे मात्र अद्याप सुटू शकलेले नाही.खरं सांगायचं झाल्यास,शिंदे यांना राजकीय सर्दी झाली होती.या राजकीय आजारामुळे त्यांच्यावर दरे गाव गाठण्याची पाळी आली.मुख्यमंत्रीपद हातून गेल्यामुळे त्यांचे स्वास्थ बिघडले असावे.पण आता भाजप व अजित पवार गटात होणारी जवळीक व भाजपने कोणालाही विश्वासात न घेता थेट शपथविधीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे शिंदे गटाचे धाबे दणाणले व दीपक केसरकर दरे गावात दाखल झाले.त्यानंतर काही क्षणात शिंदे यांच्या हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने उड्डाण केले.भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी या आजारपणात त्यांच्या प्रकृतीची चौकशी तर केली नाहीच,पण परस्पर निर्णय घेण्यास सुरुवात केली,त्यामुळे मुख्यमंत्र्यांची आज राजकीय सर्दी अचानक गायब झाली.

