दीपक मोहिते,
” न्यूजलाईन,”
पालघर ; चार विधानसभा मतदारसंघात फेरमतमोजणीची मागणी,
पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी १२९ विक्रमगड,१३१ बोईसर,१३२ नालासोपारा व १३३ वसई या चार मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी या निकालावर गंभीर प्रश्न उपस्थित करत केंद्रिय निवडणूक आयोगाकडे फेरमतमोजणी करण्याची मागणी केली आहे.
हितेंद्र ठाकूर,क्षितिज ठाकूर,राजेश पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा यांनी आयोगाला पत्र लिहून ही मागणी केली आहे.या चारही मतदारसंघातील निकाल पाहून मतदार देखील सध्या संभ्रमावस्थेत सापडले आहेत.वसई विधानसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांचा अवघ्या ३ हजार १५३ मतांनी पराभव झाला होता.१३३ वसई विधानसभा मतदारसंघ हा आ.ठाकूर यांचा गेली तीस वर्षे बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.त्या मतदारसंघात नवख्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव होतो,हे वसईच्या मतदारांच्या मनालाही अद्याप पटलेले नाही,” कुछ तो गडबड है,” अशी शंका त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे आ.हितेंद्र ठाकूर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे.त्यांच्यासोबत इतर तीन उमेदवारांनीही तशीच मागणी केली आहे.त्यांच्या या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय देते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

