दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
शिंदे यांचा प्रचंड कोंडमारा ; ” तेलही गेलं आणि तूपही गेलं,हाती आले धुपाटणे,”
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सहा दिवस उलटून गेल्यानंतरही भाजपने मुख्यमंत्री कोण ? हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही.हे पद भाजपकडे गेल्याचे स्पष्ट झाले असले तरी मुख्यमंत्री म्हणून अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आलेला नाही.देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.
मंत्रिमंडळाचा शपथविधी आता ५ डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.प्रचंड बहुमत मिळूनही मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्यास विलंब का होत आहे,याविषयी महायुतीचा घटक पक्षाचा एकही नेता बोलायला तयार नाही.निकालानंतर मुख्यमंत्री पद कोणाला ? यावरून भाजप व एकनाथ शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती.पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी या पदावर भाजपचा अधिकार आहे,कारण भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत,असे शिंदे यांना खडसावून सांगितल्यानंतर शिंदे नरमले.मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात भाजपने शिंदे यांच्या समोर त्यांच्या एका खासदाराला केंद्रात कॅबिनेटमंत्री व शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद,असे दोन पर्याय ठेवले,पण त्यांनी हे पर्याय मान्य केले नाहीत.या बैठकीत शिंदे यांनी गृह,सार्व.बांधकाम,
नगरविकास,महसूल ही चार महत्वाच्या खात्याची मागणी केली,पण त्यांची ही मागणी मान्य झाली नाही.त्यामुळे शिंदे हे नाराज झाले व ते आता आपल्या गावी जाण्याच्या तयारीला लागले आहेत.दरम्यान शिंदे यांनी आपल्या आमदाराना आपापल्या गावी जाण्याचे आदेश दिले आहेत.” लाडकी बहीण योजना,” ही योजना शिंदे यांनी आणली व ती महायुतीने यशस्वीपणे राबवली,त्यामुळे महायुतीला प्रचंड यश मिळाल्याचा दावा त्यांच्या गटाचे आमदार करत आहे.पण भाजपने आपला हट्ट सोडला नाही.त्यामुळे नाराज झालेले शिंदे आता दरे या आपल्या मूळ गावी निघाले आहेत.

