दीपक मोहिते,
” निवडणूक विश्लेषण,”
वाढीव मतांचा फायदा नक्की कोणाला ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीची मतमोजणी अवघ्या ३६ तासावर येऊन ठेपली आहे.या निवडणुकीच्या मतदानात लक्षणीय वाढ झाली असून वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होणार ? यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.पालघर जिल्ह्यात यंदा ६५.९५ % मतदान झाले.२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ % मतदान झाले होते.यंदा त्यामध्ये ४.९१ % ने वाढ झाली आहे.हे वाढीव मतदान कोणाच्या पारड्यात जाईल,यावर राजकीय पक्षात चढाओढ आहे.
२००९ पासून सलग झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा विधानसभा जागांपैकी सर्वाधिक जागा ( ३ ) जागा बहुजन विकास आघाडी जिंकत आली.तर १२९ विक्रमगड विधानसभा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसने आश्चर्यकारकरीत्या जिंकली.त्यांचे सुनील भुसारा निवडून आले.१२८ डहाणू मतदारसंघात काही किरकोळ अपवाद वगळता एकाही मार्क्स.कम्यू.पक्षाने आपले कायम वर्चस्व राखले.यावेळी मात्र भाजपने त्यांच्यासमोर प्रचंड आव्हान उभे केले आहे.त्यांचे विनोद मेढा हे यावेळी विजयी होतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.१३० पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे ( उबाठा ) कायम वर्चस्व राहिले.मात्र या निवडणुकीत शिंदे गटाने त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे यावेळी बाजी मारतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.१३१ बोईसर मतदारसंघात तीनही उमेदवार तुल्यबळ असून विद्यमान आ.राजेश पाटील यांच्या विरोधात त्यांचे एकेकाळचे सहकारी व बहुजन विकास आघाडीचे माजी आ.विलास तरे हे शिंदे गटातून ठाकले आहेत.तसेच या मतदारसंघात शिवसेनेचे ( उबाठा ) डॉ.विश्वास वळवी हे देखील उभे आहेत.त्यामुळे मतविभागणी होऊन त्याचा फायदा आ.राजेश पाटील यांना होऊ शकतो,पण बोईसर पश्चिम भागात होणारी त्यांची पिछेहाट,या मतविभागणीमधून मिळणारी मते भरून काढू शकतील का ? हा खरा प्रश्न आहे.तसेच या मतदारसंघातील वसईतील मतदारांची मते मिळवण्यात विलास तरे यशस्वी ठरले तर मात्र येथील लढत रोमहर्षक अवस्थेत जाईल व विजयासाठी पाटील व तरे या दोघांना शेवटच्या फेरीपर्यंत एकमेकांशी झुंजावे लागणार. जो उमेदवार विजयी होईल,त्याला केवळ दोन ते तीन हजार मतांचे मताधिक्य मिळेल.१३२ नालासोपारा व १३३ वसई,या दोन्ही विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे आ.हितेंद्र ठाकूर हे सातव्यांदा व आ.क्षितिज ठाकूर हे चौथ्यांदा बाजी मारतील.पैसेवाटप प्रकरणी मतदारांची सहानुभूती या दोघांना मिळाल्यामुळे या दोघांच्या मताधिक्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

