दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.११,
प्रभाग क्र.११ हा भौगोलिकदृष्ट्या विचित्र व त्रासदायक,
या प्रभागात बाहेरून स्थायिक झालेले सर्वसामान्य नागरिक व स्थानिक रहिवाश्यांचा समावेश आहे.समेळपाडा,निळेगाव,उमराळे तलाव,पाटील आळी,खवणे आळी,करमाळे या परिसरात स्थानिक भूमीपुत्राचा भरणा आहे.त्यामध्ये सामवेदी,कुपारी,या समाजाचा समावेश आहे.तर म्हाडा कॉलोनी सिद्धिविनायक हॉस्पिटल,यशवंत नगर,श्रीप्रस्थ,सिविक सेंटर व साईबाबा मंदिर येथील नागरी वसाहतीमध्ये बाहेरून आलेल्यांची संख्या लक्षणीय आहे.पूर्वी येथील मतदार हा कायम बहुजन विकास आघाडीचा समर्थक म्हणून ओळखला जायचा.सामवेदी हा समाज कायम हिंदुत्वाचा समर्थक राहिला असून तो आपली मते शिवसेनेला देत असतो.यावेळी ती मते भाजपच्या पारड्यात जातील,असा अंदाज आहे.उर्वरित ख्रिस्ती समाजाची मते ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व बहुजन विकास आघाडी या दोघांमध्ये विभागली जातील.उर्वरित प्रभागातील बाहेरून आलेल्यांची मते भाजपकडे जातील.म्हाडा वसाहतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी न लावल्यामुळे येथील नागरिकांमध्ये बहुजन विकास आघाडी विषयी प्रचंड नाराजी आहे.त्याचा फटका या निवडणुकीत त्यांना बसण्याची शक्यता आहे.

   हा प्रभाग भौगोलिक दृष्ट्या अत्यंत किचकट असा आहे.अनेक परिसराचा एकमेकांशी मेळ बसत नाही.प्रभागात एकूण ४२ हजार ८०१ इतके मतदार आहेत,त्यापैकी २ हजार ३३८ मतदार अनु.जाती तर अनु.जमातीचे १ हजार ३२७ मतदार आहेत.या प्रभागाची रचना इतकी विचित्र आहे की येथे होणाऱ्या लढतीमध्ये मतदार कोणाला साथ देतील,हे सांगणे कठीणच आहे.या प्रभागरचने संदर्भात कदाचित हरकती नोंदवण्यात आल्या असाव्यात.बहुजन विकास आघाडी जर महाविकास आघाडीमध्ये सामील झाल्यास या प्रभागावरून शिवसेना ( उबाठा ) व त्यांच्यामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.महायुतीमध्ये हा प्रभाग भाजपच्या वाट्याला येईल.त्यामुळे एकनाथ शिंदे गटाच्या एक इच्छुक महिला उमेदवाराकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे.पण या महिला उमेदवाराचे कार्यक्षेत्र हे केवळ समेळपाडा व नालासोपारा पश्चिम साईबाबा मंदिरापूरते मर्यादित असल्यामुळे भाजपच्या उमेदवाराला फारसा फटका बसू शकणार नाही.या प्रभागात नागरी सुविधा व परिसर विकासाचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित असून त्यामध्ये पाणी,आरोग्य,वैद्यकीय सेवा,दर पावसाळ्यात परिसर जलमय होणे,नालेसफाई,वीजपुरवठा वारंवार खंडित होणे व दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नाचा समावेश आहे.त्यामुळे मतदार या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणतील,असा अंदाज आहे.

 
									 
					

