दीपक मोहिते,
देश एका भयावह वळणावर – भाग क्र.-१
देशाची वाटचाल आर्थिक खाईच्या दिशेने सुरू….
देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे पूर्ण होत आली आहेत.या प्रदीर्घ वाटचाली नंतर तो आता एका भयावह वळणावर येऊन पोहोचला आहे.कोणी कितीही दावे करोत,पण देशाचा चेहरा पार काळवंडला गेला आहे.आपले नराधम राजकारणी देशाच्या पुरोगामी चेहऱ्यावर धर्मांधतेचे काळे फासण्यात यशस्वी झाले आहेत.त्यामुळे देशाची आर्थिक,सामाजिक व सांस्कृतिक,घडी पार विस्कळीत झाली आहे.सत्ता ही गोरगरिबांच्या उत्थानासाठी नाहीतर ओरबडण्यासाठी असते,असा गैरसमज करून घेऊन गेल्या आठ दशकात राजकारण्यांनी आपला देश लुटला.अक्षरशः देशाचे लचके तोडले.धर्मवादाने समाजवादाचा फडशा पाडला.अशी परिस्थिती असताना देखील आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला देश पाच ट्रीलियन डॉलर्सची अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे जगभरात सांगत सुटले आहेत.
पण हे सांगताना,ते आपल्यावर किती कर्ज आहे व आपला देश कसा कर्जाच्या खाईत नखशिखांत बुडाला आहे,याविषयी तोंडातून अवाक्षर काढत नाहीत.२०१४ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी,सत्तेत असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर टीका करताना एक वाक्य सतत बोलत असत,ते बोलायचे ” अमेरिकेच्या डॉलर्सच्या तुलनेत नेपाळचे चलन पडत नाही,भुतानचे चलन पडत नाही,श्रीलंकेचे चलन पडत नाही,इस्रायलचे चलन पडत नाही,मग भारताचा ” रुपया क्यो पतला होते जा रहा है ?” प्रचारात जेव्हा मोदी अशाप्रकारची टीका करत असताना,त्यावेळी आपल्याला अमेरिकेच्या एका डॉलर्ससाठी ५६ रु.मोजावे लागत होते.आज त्याच एका डॉलर्ससाठी आपल्याला ८७ रु.मोजावे लागत आहेत.तरीही हेच मोदी १४३ कोटी जनतेला पाच ट्रीलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेची गाजरे वाटत सुटले आहेत.कृषी,रोजगार,
शिक्षण,सामाजिक न्याय व समानता,आरोग्य,उद्योग इ. महत्वाची क्षेत्रे गेल्या बारा वर्षात बाळसं धरू शकली नाहीत.समाजात विषमता सतत वाढत चालली आहे,लोकांचे दरडोई उत्पन्न वाढू शकले नाही.आजही ८० कोटी जनता ५ किलो धान्यासाठी रांगेत उभी असते,ग्रामीण भागातील जनतेची पाण्यासाठी होत असलेली भटकंती अद्याप थांबू शकलेली नाही,आणि आमचे पंतप्रधान म्हणतात,” हर घर,नलसे जल,” आजही देशाच्या ग्रामीण भागातील लाखो गावातील कुटुंबे विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत.निरक्षरता आजही ” जैसे थे,” स्थितीतच आहे.कुपोषणाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे.बालमृत्यू व गरोदर महिलांच्या मृत्यूचा वेलू गगनावर पोहोचला आहे आणि आपले मायबाप सरकार धर्माचे राजकारण करण्यात गुंतले आहे.आपल्या देशाच्या सीमा धगधगत आहेत.चारीबाजुनी शत्रूंनी आपल्याला घेरले आहे.चीनचा ड्रॅगन दिवसागणिक आपला भूभाग स्वतःच्या घश्यात घालत आहे.पण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आलिशान विमानातून व अंगावर लाखो रु.कि.सूट घालून जगाच्या सफारीचा आनंद लुटत आहेत.
क्रमश:

