दीपक मोहिते,
” व्यक्तिविशेष,”
रविंद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड ; भाजप,स्था.स्व.सं.ही खिश्यात घालणार…
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.गेल्या पाच वर्षात कोकण प्रदेशातील तमाम निवडणुकीत चव्हाण यांनी केलेली दैदिप्यमान कामगिरी लक्षात घेता त्यांच्यावर लवकरच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत होते.त्यानुसार त्यांची आता वर्णी लागली आहे.यासंदर्भात पक्षातर्फे अधिकृत घोषणा झाली नसली तरी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
रविंद्र चव्हाण यांचा जन्म २० सप्टेंबर १९७० रोजी झाला.त्यांच्या राजकीय जीवनाला तेवीस वर्षांपूर्वी ( २००२ साली ) सुरुवात झाली.सन २००५ मध्ये ते कल्याण – डोंबिवलीमहानगरपालिकेत सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले.त्यानंतर २००९,२०१४,२०१९ व २०२४ असे चारवेळा विधानसभेवर निवडून गेले.जुलै २०२० मध्ये त्यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.त्यानंतर २०२२ मध्ये त्यांची शिंदे सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री म्हणून वर्णी लागली.त्याच सुमारास त्यांच्याकडे पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री चालून आले.पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम अतुलनीय असे होते.या दोन्ही जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुका जिंकण्यात त्यांचा सिहांचा वाटा होता.या दोन्ही जिल्ह्यात त्यांनी शिवसेनेचा ( उबाठा ) सुपडा साफ केला.तर वसई तालुक्यात बहुजन विकास आघाडीची तीन दशकाची सत्ता उलथवून टाकण्यात त्यांनी आखलेली रणनिती भल्याभल्या राजकीय विश्लेषकांना अचंबित करणारी होती.तसेच पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शिवसेनेला ( उबाठा ) हद्दपार करण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.खा.नारायण राणे यांच्या विजयात त्यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे सेनेचे विनायक राऊत याना लोकसभेची दारे बंद झाली. त्यांचा हा चढता राजकीय आलेख लक्षात घेऊन या आठवड्यात राज्याचे प्रभारी किरण रिजीजू प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करणार आहेत.त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होत असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीतही लोकसभा व विधानसभा निवडणुकी पाठोपाठ भाजपला सुगीचे दिवस येणार,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 
									 
					

