दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फियास्को झाला….
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा शिंदे सरकारने आरक्षण,निवडणूक लढवणे व पाडापाडीचे राजकारण करणे,या तिन्ही विषयी अक्षरशः फियास्को केला आहे.विरोधात उमेदवार उभे करणार,त्यानंतर उमेदवार पाडणार,अशा गगनभेदी गर्जना करणारे मनोज जरांगे पाटील आता वृत्तवाहिनीच्या स्क्रिनवरूनही दिसेनासे झाले आहेत.काही महिन्यांपूर्वी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी अंतरवाली सराटी येथे महिनो न महिने बूम व कॅमेरे घेऊन ठाण मांडून बसायचे,आता सारं काही ओस पडल आहे.सरकार पण आता त्यांची फारशी दखल घेत नाही.जरांगे पाटील यांनी इच्छुक उमेदवाराकडून
निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवले,त्यांच्या मुलाखती घेतल्या व त्यानंतर अचानक त्यांनी निवडणुका न लढवण्याचे जाहीर केले.ज्या इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले,त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी,असे आवाहन केले.पण अनेक उमेदवारांनी त्यांचे ऐकले नाही.त्यामुळे संतापलेल्या जरांगे यांनी कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे.कोणत्या आधारावर कारवाई करणार ते मात्र अद्याप कळू शकले नाही.अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांवर कारवाई कशी होऊ शकते ? या सर्व घडामोडीवरून जरांगे पाटील यांचा वैचारिक गोंधळ उडाला असल्याचे स्पष्ट होत आहे.शिंदे सरकारने मराठा आरक्षण प्रश्नी त्यांचा पोपट केला असून त्यांच्या आंदोलनाला असलेला मराठ्यांचा पाठिंबा देखील कमी होण्याची शक्यता आहे.केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय आरक्षण मिळणे शक्य नाही.संसदेत आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात जोवर कायदा होत नाही,तोवर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकणार नाही.भाजप संसदेत या विषयीचे विधेयक कदापि आणणार नाही.ज्यांचा मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध आहे,अशा उमेदवारांना आम्ही पाडणार,ही घोषणा देखील हवेतच विरली गेली.

