दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
महायुतीच्या नेत्यांनी आपल्या वाचाळवीराना आवरावे,
काल पुरोगामी महाराष्ट्राचा सुसंस्कृत चेहरा काळवंडला गेला.महायुतीचे आ.सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या.त्यांच्या या टीकेचे राज्यात जोरदार पडसाद उमटले व विविध स्तरावरुन त्यांचा निषेध करण्यात आला.आपली राजकीय ताकद किती,आपण स्वतःला शेतकरी नेते म्हणवून घेतो.पण आपण शेतकऱ्यांची कशी लूट केली ? त्याचे भान न ठेवता त्यांनी शरद पवार यांच्या आजारावर टीका करावी,हे मराठी मनाला पटलेले नाही.त्यामुळे त्यांना भाजपमधूनही चांगलेच खडे बोल सुनावण्यात आले.पण अशा लोकांना खडे बोल सूनावुन भागणार नाही,तर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची गरम आहे.या खोतांनी सत्तेच्या हव्यासापोटी एकेकाळचे आपले सहकारी शेतकरी नेते राजू शेट्टी यांना दगा दिला ते सदाभाऊ खोत,आता सूर्यावर थुंकण्याचा अश्लाध्य प्रकार करत आहेत.शरद पवार यांच्या शारीरीक व्यंगावरून टीका करताना काय म्हणाले ते पहा जरा,ते म्हणाले,शरद पवार हे महाराष्ट्राचा चेहरा बदलायला निघाले आहेत,त्यांना महाराष्ट्राचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले.महायुतीमधील अनेक नेत्यांनीही तीव्र शब्दात त्यांचा निषेध केला.ही जी मंडळी भाजपने गोळा केली आहेत,ती भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरणार आहेत.अमोल मिटकरी,सदाभाऊ खोत,गोपीनाथ पडळकर व अन्य काही वाचाळवीरामुळे महायुती सतत अडचणीत येत असते.आता निवडणुकीच्या काळात जर असं घडायला लागलं तर मात्र महायुतीला राज्यात चांगलाच दणका बसण्याची शक्यता आहे.

