दीपक मोहिते,
मनोज पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळे संघाचे पदाधिकारी नाराज,
भाजपचे मनोज पाटील व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे समीर वर्तक हे दोघेही वसई व नालासोपारा मतदारसंघातून इच्छुक होते.पण त्यांना डावलून वसई येथे भाजपने स्नेहा दुबे व काँग्रेसने संदीप पांडेय या दोघाना उमेदवारी दिली.त्यामुळे या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत.त्यांच्या या नाराजीचा फटका उभय पक्षांना बसण्याची दाट शक्यता आहे.
मनोज पाटील हे संघाच्या मुशीतून वरपर्यंत पोहोचलेले नेते असून त्यांनी वसई तालुक्याच्या नागरी समस्यांवर आंदोलने,मोर्चे,आदी कार्यक्रम राबवले.तसेच आपल्याला वसई मतदारसंघातून उमेदवारी मिळावी,म्हणून त्यांनी पक्षाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले.पण पालकमंत्री रविंद्र चव्हाण व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले दान विवेक पंडित यांच्या पारड्यात टाकले.विवेक पंडित यांनी आपल्या मुलीला स्नेहा दुबेला येथून उभे केले.वास्तविक स्नेहा दुबे या श्रमजीवी संघटनेच्या नेत्या,त्यांचा आजवर एकाही राजकीय पक्षाशी दुरान्वये संबंध आला नाही.विवेक पंडित स्वतः व त्यांचे संपूर्ण कुटूंब हे समाजवादी विचारसरणीचे,त्यामुळे हिंदुत्ववादी पक्षाला त्यांचा कायम विरोध असायचा.पण गेल्या काही वर्षात विवेक पंडित व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये जवळीक वाढली व फडणवीस यांनी त्यांना अनु.जमाती मंडळाचे प्रमुख पद सोबत राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळवून दिला.या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या मुलीला उमेदवारी मिळावी म्हणून या निवडणुकीत जोरदार प्रयत्न केले व ते यशस्वी ठरले.गेल्या १५ दिवसापासून वर्षा व सागर बंगल्यावर त्यांच्या सातत्याने फेऱ्या सुरू होत्या.त्यामुळे भाजपमधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या मनोज पाटील यांच्या तोंडाचा घास काढून घेतला गेला.या सर्व घडामोडीमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी प्रचंड नाराज झाले आहेत.याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी मनोज पाटील यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण,त्यांनी बोलण्यास साफ नकार दिला.

