दीपक मोहिते,
उद्यापासून आ.ठाकूर नावाचे वादळ घोंगवण्यास सुरुवात होणार,
१३३ वसई विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे विजय पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे,पण त्यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे काँग्रेस पक्षातील एक गट व शिवसेना ( उबाठा गट ) नाराज झाला आहे.त्यांनी आम्ही काम करणार नसल्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे विजय पाटील यांना या निवडणुकीत अनेक अडचणीना तोंड द्यावे लागणार आहे.दुसरीकडे या मतदारसंघात भाजपने आपला उमेदवार जाहीर न केल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.निष्ठावंत इच्छुक उमेदवाराला डावलून पक्षात योगदान नसलेल्या इच्छूकाला उमेदवारी देण्यात येणार असल्याचे कळल्यानंतर स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या सर्व घडामोडी घडत असताना बविआचे सर्वेसर्वा आ.हितेंद्र ठाकूर यांनी लोकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली असून त्यांना वसईकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
आ.हितेंद्र ठाकूर हे उद्या सातव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.त्यासाठी उद्या पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते त्यांच्यासोबत मिरवणुकीने येणार आहेत.त्यांची ही मिरवणूक न भूतो न भविष्यती अशी होणार आहे.उमेदवारी अर्ज अद्याप दाखल झाला नसतानाही आ.ठाकूर यांनी हितचिंतक व समाजातील विविध घटकांशी संपर्क करण्यास सुरुवात केली आहे.त्यांच्या या मोहिमेला वसईकर जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे.लोकांच्या आग्रहाखातर ते सातव्यांदा रिंगणात उतरले आहेत.त्यामुळे ठिकठीकाणी मतदारांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.वसई रोड येथे राहणाऱ्या ६५ वर्षे वयाच्या मेरी जॉन यांनी आ.ठाकूर यांना ” तुम्ही निवडणूक लढवण्याचा चांगला निर्णय घेतलात,आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हीच हवेत,तुमचा वचक असल्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत,” असे सांगितले.तसेच या निवडणुकीत आमदारसाहेब तुम्ही प्रचंड मताधिक्य घेत विक्रम करणार असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.उद्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आ.ठाकूर यांचा अश्वमेघ घोडा चौफेर उधळणार आहे.त्यांच्या कार्यकर्त्यांची फौज त्यासाठी सज्ज झाली आहे.

