दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ; वसईच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला,
अखेर आज १३३ वसई विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्यात आला.आज प्रसिद्ध झालेल्या उमेदवाराच्या विजय पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.ही यादी प्रसिद्ध होण्यास सतत उशीर होत गेल्यामुळे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांना नैराश्य आले होते.तर दस्तुरखुद्द उमेदवार वेगळा विचार करण्याच्या तयारीत होते.पण आज दुपारी यादी प्रसिद्ध झाली आणि कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.पण काँग्रेसला ही निवडणूक सोपी नाही,कारण नवघर-माणिकपूर शिवसेनेच्या ( उबाठा ) पदाधिकाऱ्यांनी ही जागा काँग्रेसला गेल्यास आम्ही त्यांचे काम करणार नाही व आपल्या पदाचे राजीनामे देऊ असा इशारा दिला आहे.आता हे पदाधिकारी काय भूमिका घेतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विजय पाटील यांनी २०१९ साली वसई विधानसभा निवडणूक लढवली होती.पण आ.हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचा प्रचंड मताधिक्य घेत पराभव केला होता.आता पुन्हा ते एकमेकांसमोर उभे ठाकत आहेत.
विजय पाटील हे एकेकाळी आ.हितेंद्र ठाकूर यांचे निकटचे सहकारी होते.दहा वर्षांपूर्वी बविआच्या तिकिटावर ते वसई पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडून आले होते.पण कालांतराने त्यांच्यात मतभेद निर्माण झाले व ते गेल्या पाच वर्षात पार विकोपाला गेले.वसई काँग्रेस पक्ष देखील कधीही एकसंघ असा पाहायला मिळाला नाही.आजही पक्ष गटातटामध्ये विभागला गेला आहे.ही अशी स्थिती गेल्या वीस वर्षांपासून असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षबांधणी कधीही लक्ष दिले नाही.तशीच स्थिती पालघर जिल्हा काँग्रेसची झालेली पाहायला मिळते.अशा बिकट परिस्थितीमध्ये काँग्रेस ही निवडणूक लढवत आहे.२५ वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाची नाळ सर्वसामान्य माणसाशी जुळलेली होती,ती आता साफ तुटली आहे.गेल्या दहा वर्षात पक्षाला साधी ग्रामपंचायत जिंकता आली नाही.आर्थिकदृष्टया सक्षम असलेले विजय पाटील हे पक्षात सामील झाले पण पक्षाला ऊर्जा देऊ शकले नाही.त्यांच्याकडे आजच्या घडीला मनुष्यबळाची उणीव आहे.गेल्या चार ते पाच वर्षात त्यांनी क्रीडा संस्थांना भरघोस मदत केली.( क्रिकेटचे सामने भरवण्यासाठी आर्थिक मदत करणे,क्रीडा साहित्य खरेदी करून देणे व सामाजिक संस्थांच्या उपक्रमांना मदत करणे,) पण या अशा संस्थेचे सदस्य हे कधीही पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते झाले नाहीत,व पुढेही होणार नाहीत.त्यामुळे यंदा प्रचारात त्यांना मनुष्यबळाची उणीव नक्की जाणवणार.याउलट आ.हितेंद्र ठाकूर यांच्याकडे तरुण कार्यकर्त्यांची तडफदार फौज आहे.ही फौज आजवर झालेल्या निवडणुकीत स्वतःला झोकून देत आली.त्यामुळे ही निवडणूक देखील एकतर्फीच होईल,असा अंदाज आहे.

