दीपक मोहिते,
भाजपच्या राजन नाईक यांना स्वपक्षातून प्रचंड विरोध,
पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या लढतीचे चित्र आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.त्यानंतर प्रचाराला रितसर सुरुवात होईल.मात्र वसई,नालासोपारा व बोईसर या तीन मतदारसंघात आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर व आ.राजेश पाटील यांनी गेल्या तीन दिवसांपासून जोरदार प्रचार सुरू केला आहे व त्यांना मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.बविआच्या तीनही उमेदवारांना मतदाराकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे.या तिघांनी आपल्या मतदारसंघातील मतदारांसोबत विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीच्या भेटी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे.
दरम्यान वसई व नालासोपारा,या दोन मतदारसंघाच्या संदर्भांत महाविकास आघाडीने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचू लागले आहे.महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते हे आ. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्याच्या निष्कर्षाप्रत आले आहेत,पण स्थानिक पदाधिकाऱ्यांचा त्यास विरोध असल्यामुळे या विषयी त्यांचा निर्णय सतत लांबणीवर पडत आहे.त्यामुळे महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.महायुतीतर्फे नालासोपारा विधानसभेत राजन नाईक यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे,पण त्यांच्या उमेदवारीला पक्षातून विरोध सुरू झाला आहे.पक्षाचे एक पदाधिकारी हरेश भगत यांनी आपल्या पदाचा राजीनामा थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवून दिला आहे.हा राजीनामा मिळाल्यानंतर बावनकुळे यांनी राजन नाईक यांना हरेश भगत यांची भेट घेऊन वाद मिटवा,असे आदेश दिले.पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.उलट भगत यांनी राजन नाईक यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.तसेच त्यांच्या उमेदवारीला मांगेला व उत्तरभारतीयांकडूनही विरोध सुरू झाला आहे. मांगेला समाजाचे नेते ही राजन नाईक यांच्या उमेदवारी बाबत खाजगीत नाराजी व्यक्त करत आहेत.आमच्या समाजाला कधी संधी मिळणार ? अशी विचारणा त्यांच्याकडून करण्यात येत आहे.आगरी समाजाचे हरेश भगत यांनी तर पक्षातील इतर नेत्यांना विश्वासात न घेता एककल्ली कारभार करणाऱ्या राजन नाईक यांना आमचा आगरी समाज चांगलाच धडा शिकवेल,असा गंभीर इशारा दिला आहे.त्यामुळे राजन नाईक यांना या निवडणुकीत अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.दुसरीकडे काँग्रेसकडून इच्छुक असलेले विजय पाटील यांनी वसईच्या जागेसंदर्भात निर्णय होत नसल्यामुळे वेगळा विचार सुरू केला आहे.या सर्व घडामोडी सुरू असताना आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितिज ठाकूर यांनी आपला प्रचार दमदारपणे सुरू केला आहे.त्यांना वसई व नालासोपारावासीयांकडून उदंड प्रतिसाद लाभत आहे.

