दीपक मोहिते,
” हल्लाबोल,” भाग क्र.२,
कुडाळ येथे निलेश राणे व माहीममध्ये अमित ठाकरे यांचा टिकाव लागेल का ?
कालच्या पहिल्या भागात आपण बारामती व इंदापूर या प.महाराष्ट्रातील दोन लढतीवर दृष्टिक्षेप टाकला होता.आज सिंधुदुर्गातील कुडाळ व मुंबईतील माहीम या दोन विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा आपण वेध घेणार आहोत.गेल्या विधानसभा निवडणुकीत एकसंघ शिवसेनेचे आ.वैभव नाईक व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नारायण राणे,या दोघांमध्ये सामना झाला व नारायण राणे यांना १० हजार ३७६ मतांनी पराभव पत्करावा लागला.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अनभिषिक्त राजे,अशी ओळख असलेल्या नारायण राणे यांना हा पराभव जिव्हारी लागला होता.त्यावेळी झालेल्या सरळ लढतीत नाईक यांना ७० हजार ५८२ मते मिळाली तर नारायण राणे यांना ६० हजार २०६ मताचा पल्ला गाठता आला.या पराभवानंतर राणे कुटुंबीय पार खचून गेले होते.मात्र कणकवली विधानसभा मतदारसंघात त्यांचे धाकटे चिरंजीव नितेश राणे यांनी विजय मिळवल्यामुळे राणे कुटुंबियांचे दुःख काही प्रमाणात हलकं झाले होते.या विधानसभा निवडणुकीत त्यांचे थोरले चिरंजीव निलेश राणे एकनाथ शिंदे गटाच्या तिकिटावर नाईक यांच्या सोबत दोन हात करणार आहेत.ही निवडणूक हिंसक होण्याची शक्यता आहे.निलेश राणे व वैभव नाईक हे दोघेही आक्रमक असल्यामुळे निवडणूक आयोगाचे अधिकारी व पोलीसांना डोळ्यात तेल घालून परिस्थितीवर नजर ठेवावी लागणार आहे.या निवडणुकीत कोण बाजी मारेल,हे सांगणे आजच्या घडीला अशक्य आहे.पण येथील लढत अत्यंत संघर्षमय अशी होणार आहे.
मुंबई शहरातील माहीम विधानसभा मतदारसंघातही जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे.या मतदारसंघात विद्यमान आमदार सदानंद सरवणकर व मनसेचे अमित ठाकरे या दोघांमध्ये लढत होत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांची मैत्री सर्वश्रुत असताना राज यांनी शिंदे गटाच्या सदानंद सरवणकर यांच्यासमोर आपल्या चिरंजीवाला उतरवणे,हे एक न उलगडणारे कोडे आहे.२००९ साली येथून मनसेचे नितीन सरदेसाई यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे सदानंद सरवणकर यांचा चांगले मताधिक्य घेऊन पराभव केला होता.त्यामुळे राज ठाकरे यांनी हा मतदारसंघ सुरक्षित आहे असे गृहीत धरून त्यांनी आपल्या मुलासाठी तो निवडला असावा.पण २०१४ साली सरवणकर यांनी बाजी उलटवत सरदेसाई यांचा ६ हजार ५९ मतांनी पराभव केला.२०१९ साली मनसेने विधानसभा निवडणुका लढवल्या नाहीत.त्यावेळी एकसंघ शिवसेनेतर्फे सरवणकर यांनी पुन्हा विजय मिळवला व दोन वर्षांपूर्वी शिंदे यांनी केलेल्या बंडात ते सामील झाले.त्यांची उमेदवारी या मतदारसंघात निश्चित झाली असून ते मनसेला कसे रोखतात,याकडे माहिमकरांचे लक्ष लागले आहे.राज ठाकरे यांनी आपल्या मुलाला या मतदारसंघात उतरवून एकप्रकारे जुगार खेळल्याचे मानण्यात येत आहे.कारण विद्यमान आ.सरवणकर हे देखील आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत.सहजासहजी माघार घेणाऱ्यापैकी ते नाहीत,त्यामुळे या मतदारसंघात घनघोर संघर्ष होण्याची शक्यता आहे.

