दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
महानगरपालिका निवडणुका ; राज्यात भाजपची चौफेर फटकेबाजी,
नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने अपेक्षेनुसार सर्वाधिक महानगरपालिका जिंकून पहिला क्रमांक पटकावला.या निवडणुकीत ठाणे,वसई – विरार व कल्याण – डोंबवली वगळता इतर २६ महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी एकहाती झेंडा फडकावला आहे.तसेच,उर्वरित तीन महानगरपालिकेत दमदार एन्ट्री केल्यामुळे शिंदे यांची शिवसेना व बहुजन विकास आघाडीला भविष्यात धोका होऊ शकतो.उल्हासनगर महानगरपालिकेत भाजपला काठावरचे बहुमत असले तरी सोबत असलेल्या शिंदे गटाचे नगरसेवकांना ते आपल्या जाळ्यात ओढतील, अशी शक्यता आहे.
ठाणे महानगरपालिकेत शिंदे गटाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. येथे त्यांना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याशिवाय गत्यंतर नाही. कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाला बहुमतासाठी केवळ ११ जागा कमी पडत असल्यामुळे खा.श्रीकांत शिंदे यांनी पडद्यामागे वेगाने हालचाली करत मनसेच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळवला. तरीही त्यांना बहुमतासाठी ६ जागा कमी पडत आहेत.येथे शिवसेनेला ( उबाठा ) ११ जागा मिळाल्या आहेत,पण त्यांचा शिंदे गटाला पाठिंबा मिळण्याची शक्यता फार कमी आहे. पण राजकारणात कधीही काही घडू शकते, त्यामुळे ते शिवसेनेचे ( उबाठा ) नगरसेवक फोडतील,अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वसई – विरार शहर महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले असले तरी त्यांची गाडी १०६ जागावरून ७१ वर घसरली आहे. तर भाजपने १ जागेवरून थेट ४४ जागांवर झेप घेतली आहे. भाजपने या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या ३९ तर सेनेच्या ( उबाठा ) ०५ जागा हिसकावून घेतल्या आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीने या विजयामुळे हुरळून जाता कामा नये. ही एकप्रकारे धोक्याची घंटा असल्याचे गृहीत धरून त्यांनी आपला कारभार पारदर्शकपणे करण्याची गरज आहे. निवडणूक निकालानंतर भाजप आता आघाडीच्या नगरसेवकाना बरखास्त करण्यासाठी निरनिराळे हातखंडे वापरु पाहत आहे. त्यामध्ये त्यांना यश मिळेल, असे वाटत नाही.
एआयएमआयएम या पक्षाने या निवडणुकीत १२६ जागा जिंकून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.छ.संभाजी नगर – ३३,नांदेड – १५,अमरावती – १२,धुळे – १० व मालेगाव – २१ जागा जिंकल्या असून त्यांनी या निवडणुकांच्या माध्यमातून राज्यात पाय रोवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.
राज्यातील निवडणुकीच्या निकालाचा स्कोअरबोर्ड खालील प्रमाणे आहे….
भाजप – १४३०,
शिवसेना ( एकनाथ शिंदे ) – ३८८,
राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) -१६६,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ३३७,
शिवसेना ( उबाठा ) – १५५,
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) – ३६,
मनसे – १३,
एआयएमआयएम – १२६,
इतर – २२०,
एकूण जागा – २८७१,

