दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
वसई व नालासोपारा जागांवर महाविकास आघाडी बविआला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत,
वसई विधानसभा लढवण्यासंदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.पालघर जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची ताकद नगण्य असल्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या वाट्याला आलेल्या १३१ वसई विधानसभेची जागा ते लढवतील,अशी शक्यता वाटत नाही.पालघर जिल्ह्यात सहापैकी वसईची जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वाट्याला आली आहे.नालासोपारा,पालघर व बोईसर- शिवसेना ( उबाठा ) डहाणू- मार्क्स.कम्यु.व विक्रमगड-राष्ट्रवादी काँगेस ( शरद पवार ) असे जागावाटप करण्यात आले आहे.भाजपने १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बविआच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे,वसई विधानसभा मतदारसंघात पण महायुतीकडून उमेदवार देण्यात येणार आहे.त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात बविआविरोधात महाविकास आघाडीने उमेदवार उभा करू नये,अशा निर्णयाप्रत महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आले आहेत.ते यासंदर्भात बाळासाहेब थोरात व उद्धव ठाकरे यांचे मन वळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
१३१ वसई विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी,म्हणून वसई काँग्रेसमध्ये सध्या जोरदार लाथाळ्या सुरू आहेत,पण या उमेदवारापैकी आजच्या घडीला एकाही उमेदवारामध्ये विजयश्री खेचून आणण्याची क्षमता नसल्यामुळे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते या दोन्ही जागांबाबत संभ्रमावस्थेत सापडले आहेत.या निवडणुकीत आपण आ.ठाकूर यांच्या बविआसमोर आपण उमेदवार दिले नाही तर सत्ता स्थापन करताना आपल्याला त्यांच्या तीन आमदारांची मदत होऊ शकेल,असे शरद पवार यांचे म्हणणे आहे.” जो पक्ष सत्तेत येईल,त्याला आमचा पाठिंबा,” असे कायम धोरण स्विकारणारे आ.हितेंद्र ठाकूर हे देखील शरद पवार यांच्या विनंतीला मान देतील,अशी शक्यता आहे.काल रात्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पण त्या यादीत वसई व नालासोपारा विधानसभा जागांचा समावेश नाही.त्यामुळे वसईतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सध्या संशयाची पाल चुकचुकू लागली आहे.दरम्यान काँग्रेसच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने महाविकास आघाडीने जर बविआला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर ते महाविकास आघाडीला राज्यस्तरावर फायदेशीर ठरू शकते.निवडून येण्याइतपत वसई व नालासोपारा काँग्रेस व शिवसेनेमध्ये ( उबाठा ) क्षमता नसल्यामुळे आ.हितेंद्र ठाकूर यांना पाठिंबा देण्याचा जर निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला तर ते शहाणपणाचे ठरू शकते,असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

