दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
महायुती व महाविकास आघाडी या दोघांना बंडखोरीची लागण,
महाविकास आघाडी व महायुती,या दोघांचे जागावाटप जवळपास पूर्ण होत आले आहे.१५ ते २० जागांवरून सध्या ज्या हाणामाऱ्या सुरू आहेत,त्या पण एकदोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे.शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यामुळे ८५:८५:८५ असा फार्म्युला महाविकास आघाडीने सर्वसंमत केला.१५ जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असून उर्वरित १८ जागाचा तिढा कसा सोडवायचा,यासाठी शरद पवार जोरदार प्रयत्न करत आहेत.या अठरा जागांपैकी १२ ते १३ जागा विदर्भातील आहेत.वास्तविक विदर्भात सेनेला फार मोठा जनाधार आहे,अशी परिस्थिती नाही.पण संजय राऊत व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आपापसातील भांडणामुळे हा तिढा अधिक जटील झाला आहे.पण यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे.महायुतीमध्ये ही जागावाटपाच्या प्रक्रियेने चांगलाच वेग घेतला असून महायुतीचे चित्र देखील लवकर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.महायुतीला बंडखोरीची प्रचंड लागण लागल्याचे पाहायला मिळत आहे.भाजपची नाराज मंडळी सागर बंगल्यावर तर अजित पवार गटाचे नाराज थेट शरद पवार यांचे निवासस्थान गाठत आहेत.एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यामुळे ते स्वतः नाराज आहेत.सध्या त्यांची अवस्था अमित शहा यांनी ” तोंड बांधून बुक्क्याचा मार,” अशी करून ठेवली आहे.असंगाशी संग केला कि अशी परिस्थिती निर्माण होत असते,हे आता त्यांना पावलोपावली जाणवू लागले आहे.पण सहन करण्याशिवाय त्यांच्याकडे अन्य पर्याय नाही.त्यामुळे त्यांचे अनेक नाराज पदाधिकारी ” आम्ही जातो,अमुच्या गावा,” अशा निर्णयाप्रत आले आहेत.निकालानंतर अनेक आयाराम-गयाराम पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.महाविकास आघाडीकडे शरद पवार सारखा नेता असल्यामुळे महाविकास आघाडीत निर्माण झालेला बेबनाव निर्माण झाला आहे.या निवडणुकीत दोन्ही बाजूने किमान २० ते २२ जागांवर बंडखोरीमुळे दगाफटका होण्याची शक्यता आहे.

