दीपक मोहिते,
राजन नाईक हे आ.क्षितिज ठाकूर यांना रोखू शकतील का ?
१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघातुन भाजपच्या राजन नाईक यांना उमेदवारी मिळाली आहे.त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.पक्षात त्यांना अंतर्गत विरोध असूनही ते
उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मात्र त्यांना या निवडणुकीत पक्षातील नाराज मंडळींकडून किती सहकार्य मिळेल,हे सांगता येत नाही.वसई भाजपामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गटा तटाचे राजकारण सुरू आहे.
राजन नाईक हे ज्या सामवेदी समाजाचे प्रतिनिधित्व करतात,तो समाजही शिवसेना व
बहुजन विकास आघाडीत विभागला आहे.तर किनारपट्टीवर राहणारा मांगेला समाजही असाच विभागला आहे.पालघर जिल्ह्यात मांगेला समाज मोठ्या संख्येने राहतो,पण त्यांना आजवर भाजपकडून योग्य ती संधी मिळाली नाही.त्यामुळे हा समाज भाजप,काँग्रेस या दोन्ही पक्षावर प्रचंड नाराज आहे. वसई व नालासोपारा समुद्रकिनारी राहणारा ख्रिस्ती समाज हा कधीही भाजपला आपली मते देत नाही,असा आजवरचा अनुभव आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ( उबाठा ) उमेदवार भारती कामडी यांना ख्रिस्ती समाजाची मते काही प्रमाणात मिळू शकली.कारण उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्यावेळी सहानुभूतीची प्रचंड लाट होती.त्यामुळे राजन नाईक यांची भिस्त केवळ हिंदी व गुजराती भाषिक मतदारांवर आहे.पण बविआचे आ.हितेंद्र ठाकूर यांची या दोन्ही समाजावर जबरदस्त पकड आहे,ती राजन नाईक यांना सहजासहजी ढिली करता येणार नाही.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जे घडले,तेच याही निवडणुकीत घडेल,असा अंदाज आहे.अंतर्गत विरोध व समाजातील ठराविक घटकाच्या बळावर त्यांना यावेळीही विजयस्तंभ गाठणे,शक्य होणार नाही.शिवसेनेचे ( उबाठा ) उमेदवार पंकज देशमुख हे रिंगणात उतरले तर
मतविभागणीचा फायदा बविआच्या क्षितिज ठाकूर यांना होईल.त्यामुळे राजन नाईक यांची वाटचाल अत्यंत खडतर अशी आहे.तसेच प्रचारात ते कोणते मुद्दे मांडणार,हाही एक प्रश्न आहे.सत्ताधारी पक्षावर टीका केली की त्या टीकेचा त्यांना फायदा होत असतो,असा आजवरचा अनुभव आहे.अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते कशी लढत देतात,याकडे तमाम नालासोपारावासीयांचे लक्ष लागले आहे.

