दीपक मोहिते,
मुंबईच्या क्षितिजावरून,
उमेदवारी जाहीर करण्यात भाजपने मारली बाजी,
मात्र त्यांच्या आयटी सेलचा चावटपणा सुरू,
भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून पाहिला नंबर पटकावला आहे.भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी आठ दिवसापूर्वी या यादीवर मोहोर उठवल्यानंतर ( १४ ऑक्टो.) ती दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली. होती.या यादीत ९९ उमेदवारांची नांवे आहेत.विशेष म्हणजे ८० % विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.केवळ पाच आमदारांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आहे.बंडखोरीची लागण मोठ्याप्रमाणात होऊ नये,यासाठी जुन्या चेहऱ्यांना पुढे चाल देण्यात आल्याचे दिसून आले आहे.इतर पक्षात जागावाटपावरून कलगीतुरा रंगत असताना भाजपने आपली यादी प्रसिद्ध करून एकप्रकारे बाजी मारली आहे.
कोकण विभाग-२५,
उ.महाराष्ट्र-२०,
विदर्भ-१९,
मराठवाडा-१८
प.महाराष्ट्र-१७,
अशा पाच विभागात या ९९ जागा आहेत.ज्यांना तिकीट नाकारण्यात आले आहे,त्यांच्यात थोडीफार नाराजी आहे,पण ही नाराज मंडळी बंड वगैरे करण्याच्या फंदात पडणार नाहीत.सध्या अनेक नाराज,सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत,पण या यादीत बदल करण्या इतके अधिकार फडणवीस यांना नाहीत,कारण या यादीला १४ ऑक्टो.रोजी अमित शहा यांनी मंजुरी दिली आहे.त्यामुळे या यादीत बदल होण्याची सुतराम शक्यता नाही.दुसरीकडे महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना ( उबाठा ) या दोन घटक पक्षात सध्या प्रचंड हाणामारी सुरू आहे.विदर्भातील जागांवरून हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या उरावर बसले आहेत.विदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला बऱ्यापैकी जनाधार असल्यामुळे त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी ताणून धरले आहे.दक्षिण विदर्भात नाना पटोले यांचे वर्चस्व आहे,त्यामुळे ते हट्टाला पेटले आहेत.सेनेची येथे ताकद नसतानाही संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचे कान भरल्यामुळे आघाडीमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे.हे प्रकरण दिल्लीच्या दरबारात गेल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी यांनी रमेश चेन्नीथाला यांना मुंबईला पाठवले,पण त्यांना निर्माण झालेला तिढा काही सोडवता आला नाही.दरम्यान भाजपच्या आयटी सेलने उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत तर खा.संजय राऊत व गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट झाल्याचे पिल्लू सोडून दिल्यामुळे आगीत तेल ओतले गेले.पण आघाडीत भांडणे लावण्याचा भाजपचा हा चावटपणा शरद पवार यांच्या लक्षात आला आणि त्यांनी वाद मिटवण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे.वास्तविक आघाडीचा जनाधार वाढत असताना दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी होती,पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नाना पटोले व संजय राऊत या दोघांच्याही डोक्यात हवा गेली व हा कलगीतुरा रंगला.

