दीपक मोहिते,
वसई विधानसभा मतदारसंघाचा आमदार मीच असेन – आ. हितेंद्र ठाकूर,
अखेर आम्ही केलेली दोन्ही भाकीते खरी ठरली,पहिलं भाकीत होत की चहाच्या पेल्यात उठलेले वादळ लवकरच शमणार.दुसरं भाकीत होत,वसई विधानसभा मतदारसंघातून आ.हितेंद्र ठाकूर हेच बविआचे उमेदवार असतील.आज विरार येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आ.हितेंद्र ठाकूर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
विरार पश्चिमेस असलेल्या क्लब वन येथे आज झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या उमेदवारी संदर्भात घोषणा केली. त्यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी त्याचे भाषण थांबवून वसई विधानसभा मतदार संघातून त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी, अशी एकमुखी मागणी केली.त्यानंतर बोलताना आ.ठाकूर पुढे आपल्या भाषणात म्हणाले,माझा कार्यकर्ता हीच माझी ताकद आहे.असंख्य कार्यकर्त्यांच्या या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन मी स्वतःची उमेदवारी जाहीर करत आहे.त्यांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.पालघर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातून आपण निवडणूक लढवणार आहोत,असे आ. हितेंद्र ठाकूर यांनी जाहीर केलं.या सर्व जागांवर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला व कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागा,असा आदेश दिला.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले,
गेल्या काही दिवसांपासून बहुजन विकास आघाडीमध्ये मध्यंतरी उठलेल्या वादळावर आ. हितेंद्र ठाकूर काय बोलतात,याकडे तमाम कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. राजीव पाटील हे माझ्या संपर्कात असून आम्ही सगळे कामाला लागलो आहोत,असे आ.ठाकुर यानी यावेळी स्पष्ट केले.राजीव पाटील पूर्वनियोजित कामामुळे बाहेर असल्याचे त्यांनी सांगितले,त्यामुळे ते या मेळाव्याला येवू शकले नाहीत.यावरून विरोधकांनी राजकारण करू नये.
आमची नावे कधीच खोक्यात आली नाहीत.
फुटाफुटीचं राजकारण महाराष्ट्रात सुरु असताना आमची नावं कधीही खोक्यात आली नाहीत असा टोलाही त्यांनी विरोधकांना यावेळी लगावला.माझ्यासह आपले दोन आमदार अशा राजकारणात कधी पडलो नाही आणि पडणारही नाही.
आमचा पक्ष विकासाचा मुद्दा घेऊन राजकारणात काम करत आला आहे,आम्ही विकासकामांवरच बोलणार असे ठाकुरांनी ठामपणे सांगितले.
आजच्या मेळाव्यात अनेक ज्येष्ठ नेत्यांसह अनेक कार्यकर्ते,महिला कार्यकर्त्या,तरुण कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. नायगाव,नालासोपारा आणि आचोळे भागातील असंख्य कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात बहुजन विकास आघाडीत जाहीर प्रवेश केला.

