दिपक मोहिते,
धुरळा खाली बसला,पदाधिकारी कार्यकर्ते व पीआर कंपन्या कामाला लागले,
अफवांचे पीक निवळले व समज-गैरसमजाचा धुरळा खाली बसल्यानंतर बविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते आता एकीने व एकदिलाने कामाला लागले आहेत.तिन्ही मतदारसंघात बविआच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे.सर्वत्र बैठकांचा सिलसिला जोरात सुरू झाला आहे.
या तिन्ही विधानसभा जागांवर बविआसमोर फार मोठे आव्हान नसले तरी वरिष्ठ नेते कार्यकर्त्याना गाफिल न राहता,मतदारांशी सतत संपर्क राहण्याचे आवाहन करत आहेत.लढतीचे चित्र स्पष्ट झाले कि प्रचाराचे धुमशान सुरू होणार आहे.प्रचारासाठी यावेळी सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार आहे.अनेक पक्षांनी प्रचारासाठी मुंबईतील पीआर कंपन्यांना कंत्राटे दिली आहेत.या कंपन्या आचारसंहिता व निवडणूक आयोगाची करडी नजर सांभाळून उमेदवाराच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.काही कंपन्यांनी आतापासूनच डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे.यामध्ये समाजरचना,जातीनिहाय मतदार,विकासाचे प्रलंबित प्रश्न,मतदारसंघात शिक्षण, आरोग्य,रोजगार व पायाभूत सोयी-सुविधा या क्षेत्रातील सद्यस्थितीचा समावेश आहे.तसेच ज्या पक्षाच्या कामाची जबाबदारी आपल्या कंपनीकडे आहे.त्या पक्षाच्या उमेदवाराबाबत जनमत कसे आहे,त्याला कोणत्या भागात फटका बसू शकतो.याविषयीची माहिती घेण्यासाठी अनेक कंपन्यांची टीम सध्या सर्व्हे करत आहेत.या कंपन्या दररोज दिवसभरच्या कामकाजाचे फीडबॅक
पक्षाच्या संबधित नेत्यांना देत असतात.जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा असून या निवडणुकीच्या प्रचारात तो कळीचा मुद्दा ठरू शकतो.त्यामुळे या कंपन्या कोणत्या भागात प्रश्न अधिक गंभीर बनला आहे,याविषयी माहिती घेत आहेत.तसेच एखादी समस्या प्रचारात कळीचा मुद्दा ठरू शकतो,त्याचा शोध घेऊन त्यावर कोणती उपाययोजना करणे गरजेचे आहे,यावर या पीआर कंपन्या फीडबॅक देत आहेत.पदाधिकारी,
कार्यकर्ते व या कंपन्यांचा स्टाफ यांच्यामध्ये समन्वय साधत यंदा प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे.
दरम्यान वसई विधानसभा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे तर नालासोपारा विधानसभा शिवसेनेकडे ( उबाठा ) यांना दिल्याचे वृत्त हाती आले आहे,पण त्यास महाविकास आघाडीकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

