दिपक मोहिते,
परतीच्या पावसाचा प्रताप,शेतकरी भितीच्या सावटाखाली,
गेल्या चार दिवसांपासून दररोज संध्याकाळी होत असलेल्या परतीच्या पावसाने राज्याच्या अनेक जिल्ह्यातील भातउत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.भातपिकाची अतोनात हानी झाली असून या हानीची सरकारने अद्याप दखल न घेतल्यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे.
यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाल्यामुळे शेतकरी खूप आनंदात होते,तसेच पावसाने प्रारंभी दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची प्राथमिक कामे जलदगतीने उरकली.नंतरच्या काळातही शेतीला आवश्यक असलेला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.नांगरणी,पेरणी,
आवणी,लावणी इ.कामे वेळेवर करणे,शक्य झाले.मात्र भाताची रोपे तयार झाल्यानंतर ” नेमेची येतो पावसाळा,” या युक्तीनुसार परतीच्या पावसाने कोकण विभागातील जिल्ह्यांना जबर फटका देण्यास सुरुवात केली.गेल्या पाच दिवसात झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे या सर्व जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीतील भातपिके आडवी झाली आहेत.हातातोंडाशी आलेला घास,अशा नैसर्गिक संकटामुळे हिरावला गेला.त्यामुळे शेतकरी विमनस्क स्थितीत सापडला आहे.शासकीय यंत्रणा विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतून पडल्यामुळे एकही शासकीय अधिकारी या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतीकडे फिरकला नाही.आचारसंहितेचा अंमल सुरू असल्यामुळे सध्या झालेल्या नुकसानीची पाहणी लवकरात लवकर होईल,अशी शक्यता नाही.त्यामुळे ग्रामीण भागातील भातपिक उत्पादक शेतकरी देशोधडीला लागतील,अशी भिती सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.

