दीपक मोहिते,
अखेर वादळ शमलं,कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला..
गेल्या आठ दिवसांपासून वसई तालुक्यात निर्माण झालेले चहाच्या पेल्यातील वादळ अखेर वसईच्या समुद्रकिनारी न आदळता थेट कुठेतरी भरकटले गेले.या काळात हवेच्या दाबाचा पट्टा वाढल्याचे जाणवत असताना या वादळाची तीव्रता काल संध्याकाळी अचानक कमी झाली व ते हवेतल्या हवेत विरले.
वसई-विरारचे माजी महापौर व प्रसिद्ध उद्योजक राजीव पाटील,हे भाजपमधून विधानसभेची निवडणूक लढवणार,अशा प्रकारचे वादळ उठले होते.सलग आठ दिवस हे वादळ घोंगावत राहिले.मात्र ते रौद्र स्वरूप धारण करेल,असे वाटत असताना ते अचानक शमले.या सर्व घडामोडी दरम्यान राजीव पाटील व आ.हितेंद्र ठाकूर यांनी कायम मौन धारण केले होते.पण काही उत्साही कार्यकर्त्यानी बॅनर्सवरून नेत्यांचे फोटो हटवल्यामुळे चर्चेला उधाण आले.बविआच्या एका नेत्याने आठ दिवसापूर्वी स्थानिक युट्युब चॅनेलला मुलाखत दिल्यानंतर या वादाला तोंड फुटले.कोणतीही अधिकृत माहिती हाती नसताना अनेक यूट्यूब चॅनलने याविषयी अनेकांच्या मुलाखाती घेण्याचा सपाटा लावला.दोन स्थानिक यूट्यूब चॅनेल्सने तर या वादावर विरोधकांच्या मुलाखती घेत अक्षरशः दिशाभूल करण्याचा जोरदार प्रयत्न केला.त्यामुळे राजकीय वातावरण अक्षरश ढवळून निघाले.एका नॅशनल चॅनेलने राजीव पाटील अमुक तमुक दिवशी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थित आपल्या समर्थक माजी नगरसेवकांसोबत प्रवेश करणार असल्याचे जाहीर करून टाकले.
हे सर्व घडत असताना आम्ही हे वादळ लवकरच शमणार असल्याचे वारंवार सांगत होतो.काल सांयकाळी वेगाने हालचाली घडल्या व आलेले वादळ आल्यापावली माघारी फिरले.राजीव पाटील यांनी आता निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.त्यांच्या या निर्णयावर अद्याप एकाही मोठ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीत.या वादळामुळे या दोन नेत्यांमध्ये कुठेही तणाव पाहायला मिळाला नाही.मात्र त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले होते.हे वादळ कसे शमले ? याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी दोन्ही बाजूकडून सामंजस्याची भूमिका घेण्यात आली व राजीव पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे समजते.
राजीव पाटील हे भाजपमध्ये जाणार म्हणून जी चर्चा होत होती,त्यास भाजपमधून मात्र कोणीही अधिकृत दुजोरा दिला नाही.

