दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सकडे तर हरयाणा तिसऱ्यांदा भाजपच्या ताब्यात,
जम्मू-काश्मीर व हरियाणा या दोन राज्याच्या निवडणुकीचे निकाल आज लागले.जम्मू-काश्मीर येथे अपेक्षित असा निकाल लागला.येथे नॅशनल कॉन्फरन्स व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या आघाडीला ५० जागा मिळाल्या,त्यामुळे या राज्यात या दोन्ही पक्षाचे सरकार विराजमान होईल.पण हरयाणा राज्यात भाजपने काँग्रेस पक्षाचे मनसुबे उधळून लावले.
या राज्यात मात्र काहीतरी गोलमाल झाले आहे,असा संशय काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी व्यक्त केला आहे.आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासात पिछाडीवर पडलेल्या भाजपने अचानक मुसंडी मारली व ५० जागा जिंकल्या,तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला ३४ जागांवर समाधान मानावे लागले.वास्तविक या राज्यात भाजपला जबर फटका बसेल,असा एक्झिट पोल,अनेकांनी दिला होता.पण भाजपने सुरुवातीस पिछाडीवर असताना अचानक,अशी मुसंडी मारावी,यावरून सगळेच अवाक झाले आहेत.या निकालासंदर्भात आता सर्वत्र संशय व्यक्त करण्यात येत आहे.काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानी मतमोजणी केंद्राकडे धाव घेतली आहे.त्यांनी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या निकालासंदर्भात आक्षेप नोंदवले आहेत.या राज्यात भाजपचा दारुण पराभव होईल,असा अंदाज सर्व थरातून व्यक्त होत होता.मतमोजणीच्या सुरुवातीस तो खरा ठरणार असे वाटत असताना,भाजपने ३४ वरून थेट ४५जागांवर झेप घेतली व दुपारी ३.०० वाजेपर्यंत ते ५० जागांवर स्थिरावले.अचानक झालेल्या या घडामोडीमुळे काँग्रेसचे नेते पार चक्रावून गेले आहेत.कारण शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या,महिला पहिलवानावर झालेला अन्याय व शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र,आदी कारणांमुळे राज्यात भाजपविरोधी वातावरण होते,अशावेळी भाजपला पुन्हा सत्ता मिळते,यावरून सर्वत्र संशय व्यक्त करण्यात येत आहे.

