दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मराठी भाषेला अभिजात दर्जा ; केंद्र सरकारचे ” पूतना मावशीचे प्रेम,”
आजवर झालेल्या हजारो लढाईत पराभवाची ज्याला भिती वाटली नाही,असा एकही योद्धा या पृथ्वीवर जन्माला आलेला नाही. स्वतःला देवपुरुष व जगद्गुरू म्हणवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यास अपवाद ठरू शकलेले नाहीत.आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पराभव अशा भिती मुळे ते व त्यांचे सहकारी अमित शहा,सध्या हवालदिल झाले आहेत.लाडकी बहीण योजना,वयोश्री योजना,अशा योजनांचा त्यांनी धुमधडाका लावला आहे,त्यासाठी ४३ हजार कोटी रु.ची उधळपट्टी ते करत आहेत.तरीही मतदार आपल्याला ठेंगा दाखवतील,असा अंदाज आल्यानंतर त्यांनी काल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे जाहीर केले आहे.
त्यांच्या या निर्णयाने मराठी भाषिक मतदार आपल्या बाजूने वळतील,अशी त्यांना अपेक्षा आहे.पण गेल्या तीन दशकापासून हा प्रश्न अडगळीत पडलेला असताना व अनेक संस्था याविषयी केंद्र सरकारच्या दरबारी सातत्याने पाठपुरावा करत असताना,त्यांना दारात उभे न करणाऱ्या मराठीद्वेषी केंद्रसरकारला ही उपरती का व्हावी ? अचानक त्यांना असा निर्णय का घ्यावा लागला ? त्यामागची नेमकी कारणे काय आहेत ? या तिन्ही प्रश्नांचे एकच उत्तर आहे,ते म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत मराठी भाषिक मतदारांकडून दगाफटका होण्याची शक्यता.तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने ” मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,” यासाठी केलेल्या प्रयत्नाला केंद्र सरकारने वाटाण्याच्या अक्षता कशा लावल्या,हे जगजाहीर आहे.उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी व त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई हे संबधित कागदपत्रे व दस्ताऐवज घेऊन दिल्ली दरबारात वारंवार फेऱ्या मारत होते,पण मोदी सरकारने अनेक त्रुटी काढून राज्याचा प्रस्ताव बेदखल केला.आज त्याच सरकारला मराठी भाषेचा पुळका आला आहे,त्यांचे मराठी माणसावरील प्रेम ऊतू जाऊ लागले आहे.मात्र मराठी माणसाला माहीत आहे कि सरकारचे हे प्रेम ” पुतना मावशीचे प्रेम आहे,” असो,निवडणुकीच्या निमित्ताने का होईना,पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी माणूस सुखावला गेला आहे. तरी तो आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदान करेल,असे वाटत नाही.

