दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अजित पवार गटामुळे भाजप धायकुतीला,
गृहमंत्री अमित शहा हे राज्याचा दोन दिवसीय दौरा आटोपून दिल्लीला रवाना झाले आहेत.या दोन दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यासोबत अनेक बैठका घेतल्या.महायुतीच्या घटक पक्षात निर्माण झालेला बेबनाव संपुष्टात आणण्यासाठी अमित शहा यांना वारंवार मुंबई गाठावी लागत आहे,हे आता लपून राहिलेले नाही.
अजित पवार व एकनाथ शिंदे गटासंदर्भांत भाजप कार्यकर्त्यांमध्ये सध्या प्रचंड नाराजी असून ती आगामी विधानसभा निवडणुकीत त्रासदायक ठरेल,याची जाणीव अमित शहा याना झाली असून त्यांनी सध्या स्वतःला पॅचवर्कच्या कामाला वाहून घेतले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस या तिघांविषयी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे दिल्लीश्वरांच्या ध्यानी आले असून राज्यातील यंत्रणा आपल्या हाती घेतली आहे. राज्याच्या घडामोडीत भाजपची राष्ट्रीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपने फोडाफोडीचे व खोक्याच्या राजकारणाला देखील विराम दिला आहे.गेल्या दोन वर्षात फोडाफोडी व खोक्याची उलाढाल,अशा दोन कारणाचे परिणाम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला भोगावे लागले.त्यामुळे त्यापासून भाजपने आता फारकत घेतली आहे.या निवडणुकीपर्यंत शिंदे व पवार गटाला सांभाळून घ्या,विधानसभा निवडणुकीनंतर आपण काय निर्णय घेऊ,असे दिल्लीश्वरांचे म्हणणे आहे.त्यामुळे अमित शहा हे थेट पदाधिकारी व कार्यकर्त्याशी थेट संवाद साधत आहेत.अजित पवार गटाने स्वतःहून महायुतीतून बाहेर पडावे,यासाठी परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे.पण अजित पवार हे स्वतःहून बाहेर पडणार नाहीत,कारण त्यांच्यासमोर आजच्या घडीला कोणताही पर्याय उपलब्ध नाही.त्यामुळे अजित पवार यांना सध्या ” तोंड बांधून बुक्क्यांचा मार सहन,” करण्याशिवाय गत्यंतर नाही.अजित पवार गटाने ५० ते ६० जागा मागितल्या आहेत,पण भाजप त्यांची ३० ते ३२ जागांवर बोळवण करेल,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.तसं घडलं तर ते अजित पवार यांना मान्य करावे लागेल.जर ती त्यांनी ते धुडकावले तर त्यांना भाजप ” स्वबळावर लढा,” असे फर्मान काढेल.तसं झालं तर भाजप व शिंदे गट,” सुंठीवाचून खोकला गेला,” अशा आविर्भावात या निवडणुका आनंदात लढवतील.ज्या नबाब मलिक यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देशद्रोहाचा आरोप केला होता,त्या मलिक याना अजित पवार यांनी आपल्या पक्षात सामावून घेतले,त्यामुळे फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.अजित पवार हे केवळ नबाब मलिक याना पक्षात प्रवेश देऊन थांबले नाहीत,तर त्यांची कन्या सना मलिक यांना पक्षाचे प्रवक्तेपद देऊन विरोधकांच्या हाती कोलीत मिळवून दिले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर अमित शहा याना सध्या तारेवरची कसरत करावी लागत आहे.

